जटिल हृदयविकारांवर ’इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ उपचारपद्धती ठरतेय वरदान हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकते

सांगोला/ प्रतिनिधी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे कठीण आवरण तयार झाल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टी करताना स्टेंट बसविणे अवघड ठरते. अशा जटिल रुग्णांसाठी इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी (आयव्हीएल) ही अत्याधुनिक उपचारपद्धती प्रभावी ठरत असून, रुग्णांना अधिक सुरक्षित आणि चांगले परिणाम मिळत आहेत. जटिल हृदयविकारांवर ’इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी’ उपचारपद्धती रुग्णासाठी वरदान ठरत असल्याची माहिती सिनर्जी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले, सांगोल्याचे सुपुत्र, सांगलीचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. देवकते म्हणाले, वाढते वय, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे थर साचतात. त्यामुळे स्टेंट योग्य प्रकारे बसविण्यात अडचणी निर्माण होतात. आयव्हीएल तंत्रज्ञानामध्ये विशेष धक्कातरंगांच्या सहाय्याने कॅल्शियममध्ये सुक्ष्म भेगा निर्माण केल्या जातात. त्यामुळे रक्तवाहिनी अधिक लवचिक बनते आणि स्टेंट योग्य प्रकारे बसविणे शक्य होते. या उपचारपद्धतीमुळे रक्तवाहिनीला होणारी इजा कमी होते. उपचार अधिक सुरक्षित होतात आणि दीर्घकालीन परिणामही समाधानकारक मिळतात. त्यामुळे जटिल कॅल्शियमयुक्त ब्लॉकेज असलेल्या रुग्णांसाठी आयव्हीएल हे आधुनिक तंत्रज्ञान आशादायी पर्याय ठरत आहे. हृदयविकाराच्या उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, अशा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील रुग्णांना सिनर्जी हॉस्पिटलमध्येच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सांगोल्याचे सुपुत्र डॉ. प्रदीप देवकते यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form