अकलूज प्रतिनिधी
सराफ सुवर्णकार बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि बेकायदेशीर कारवायांविरुद्ध सराफ सुवर्णकार संरक्षण समिती नेहमीच ठामपणे उभी राहिली आहे. अन्यायग्रस्त बांधवांना कायदेशीर व संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देणे व कारवाईच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार रोखने बाजारबुणगे (दलाल )यांना आळा घालणे.हा समितीचा मूलभूत उद्देश आहे. कोणताही भेदभाव न करता, कोणाचीही भीड न बाळगता, सर्वांना कायद्याच्या चौकटीत राहून मार्गदर्शन करणे व त्यांचे संरक्षण करणे हीच समितीची भूमिका आहे. आजपर्यंत अनेक सराफ सुवर्णकार व संलग्न व्यवसायिकांना समितीने न्याय मिळवून देत बाजारपेठेचा सन्मान जपला आहे.
माळशिरस तालुक्यातील घटना
अकलूज व सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे तीन सराफ बांधवांना सोलापूर एलसीबीकडून तपासासाठी बोलावण्यात आले. संबंधित बांधवांचे अर्ज घेऊन समिती पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तपासात पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली. पोलिसांनी नोटीस बजावून पुढील कार्यवाही केली.
संबंधित व्यवहाराबाबत विचारणा करण्यात आली असता, तिन्ही बांधवांनी असा कोणताही व्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट केले. समिती पदाधिकाऱ्यांनी त्यांना एलसीबी कार्यालयात नेऊन तपासात सहकार्य केले तसेच लेखी स्वरूपात आपली बाजू ठामपणे मांडली.
मात्र, यातील एक सराफ श्री. दीक्षित यांनी समितीला विश्वासात न घेता कथितरित्या सोन्याची रिकव्हरी दिल्याची बाब समोर आली. या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत —
चोरीचे सोने स्वीकारले होते का?
की कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता?
या दोन्ही मुद्द्यांवर निष्पक्ष व समांतर चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
समितीची ठाम भूमिका
या घटनेच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आणि बांधवांनी एकजूट दर्शवली. समितीच्या नियमांचे उल्लंघन व एकजुटीचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाल्याने, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे श्री. दीक्षित यांच्या संदर्भात समांतर तपासासाठी अधिकृत तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. हे निवेदन समितीचे कायदेविषयक सल्लागार अॅड. विशाल वेदपाठक यांचे मार्गदर्शनात व जिल्हा सरचिटणीस विशाल दहिवाळ यांनी दिले.
प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले की, चोरीचा माल खरेदी करणाऱ्या सराफांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. काही टक्के लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण सराफ बाजारपेठ बदनाम होते. त्याचप्रमाणे, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन होते. म्हणूनच दोन्ही बाजूंनी निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही समितीची ठाम मागणी आहे.
समिती न्याय, पारदर्शकता आणि संविधानिक मूल्यांप्रती कटिबद्ध आहे.
जय हिंद!
जय नरहरी!
जय महाराष्ट्र!
जय शिवराय!
जय संविधान!
