पंढरपूर प्रतिनिधी :
पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून, कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तुंगत गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, ते बंद करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट अवैध धंदे करणाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असून, हे व्यवसाय अधिक जोमाने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर तडीपारीसह कठोर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच डॉ. अमृता आबासाहेब रणदिवे, उपसरपंच प्रकाश नागनाथ रणदिवे व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, तालुका पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे. प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते, याकडे आता तुंगत ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
