संत नामदेव पायरी व पुंडलिक मंदिरासमोर भावपूर्ण सादरीकरण
पंढरपूर प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाचे संस्कार, भक्ती आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना लहानपणापासून व्हावी या उदात्त उद्देशाने सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी (पंढरपूर) येथील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भव्य वारकरी दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि विठ्ठल नामस्मरणात निघालेल्या या दिंडीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
दिंडीतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून संत नामदेव पायरी तसेच पुंडलिक मंदिरासमोर अभंग, हरिपाठ, भारूड आणि वारकरी परंपरेवर आधारित सांस्कृतिक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
संत नामदेव पायरी ही वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानली जाते.संत नामदेव महाराजांच्या अखंड विठ्ठलभक्तीचे आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या या पायरीला वंदन करून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. तर पुंडलिक मंदिर हे माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचा संदेश देणारे पवित्र स्थान आहे. भक्त पुंडलिकाच्या आदर्श जीवनातून कर्तव्य, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार, भक्ती, शिस्त, समता, सेवा, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची प्रेरणा मिळाली. आधुनिक शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये आणि सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सिंहगड पब्लिक स्कूलचा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.
विद्यार्थ्यांच्या या भक्तिमय सादरीकरणाला भाविकांनी उत्स्फूर्त दाद देत शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास करांडे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. स्मिता नवले तसेच मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. वारकरी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या पिढीला नितांत आवश्यकता असून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, भक्तीभाव आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी शाळा सातत्याने असे उपक्रम राबवत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



