संत गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या ठिकाणी शिबिराचे आयोजन
पंढरपूर /प्रतिनिधी
समता सैनिक दलाच्या पंढरपूर शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील गौतम विद्यालयात बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात पंढरपूरसह माळशिरस, माढा, सांगोला व करमाळा तालुक्यांतील सुमारे १२० सैनिकांनी सहभाग घेतला.
तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून तसेच समता सैनिक दलाच्या ध्वजाला सलामी देऊन शिबिराची सुरुवात झाली. भारतीय बौद्ध महासभेचे सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष जितेंद्र आठवले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
शिबिरात समता सैनिक दलाची कार्यपद्धती, शिस्त, संघटन, सामाजिक बांधिलकी आणि समाजात समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परेड, विविध प्रात्यक्षिके, आचारसंहिता, बौद्धिक मार्गदर्शन, लाठी-काठी तसेच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.महार रेजिमेंटचे निवृत्त मेजर जनरल अॅड. अनिल कांबळे व केंद्रीय शिक्षक मेजर यशवंत साबळे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी पंढरपूर, माळशिरस, माढा, सांगोला व करमाळा शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी शिस्तबद्ध व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. ध्वजारोहण, जनरल सलामी व शपथग्रहणाने शिबिराची सांगता झाली.

