पंढरीत प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते होणार सन्मान सोहळा
आषाढी यात्रेत वारकरी व पोलिसांसाठी सेवाभावी उपक्रम; मास्क, औषधांचे वाटप आणि मदत केंद्राची सुविधा
पंढरपूर / प्रतिनिधी
आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या मानाच्या पालख्यांचे स्वागत आणि सन्मान यंदा मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते शुक्रवार, २४ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान पंढरपूर शहरात आगमन करणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह मानाच्या दहा पालख्यांचे स्वागत व सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी पत्रकार संघाने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले आहे. यात्रेच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या पुरुष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पत्रकार मुज्जमील कमलीवाले यांच्या सहकार्याने मास्क तसेच गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय, आषाढी यात्रा काळात पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा हरवलेल्या भाविकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य सक्रियपणे मदत करणार आहेत. यात्रेदरम्यान वारकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करून त्यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली.
धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत वारकरी, पोलिस कर्मचारी आणि भाविकांच्या सेवेसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम आषाढी यात्रेत विशेष आकर्षण ठरणार असून, मराठी पत्रकार संघाच्या या सेवाभावी कार्याचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
