*सोलापूर चा गौरव : योगाने घडवणारे निरोगी समाजशिल्पी जितेंद्र महामुनी.*

*सोलापूरच्या अवंतीनगरमधील निवृत्त रेल्वे अधीक्षक तथा श्री कालिका मंदिर समितीचे माजी अध्यक्ष श्री. सुरेशराव महामुनी साहेब यांचे सुपुत्र श्री. जितेंद्र महामुनी यांची कथा केवळ प्रेरणादायी नाही, तर आजच्या काळासाठी आरसा आहे.* *योग प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मिळालेल्या ज्ञानाचा खजिना त्यांनी स्वतःपुरता बंद न ठेवता समाजाच्या आरोग्यासाठी खुला केला. गेली पाच-सहा वर्षे सोलापूर च्या शिवस्मारक येथे ते नित्यनियमाने, निःस्वार्थ भावने मोफत योग वर्ग घेत आहेत. एक रुपया दक्षिणा नाही, एक रुपया फी नाही - फक्त "सेवाच खरी पूजा" ही भावना!* *या सेवाकार्यात त्यांच्या अर्धांगिनी सौ. मीरा महामुनी यांचा सहभागही तितकाच मोलाचा आहे. नवरा-बायकोने मिळून एक कुटुंब नव्हे, तर संपूर्ण शिवस्मारक परिसराला आपलं कुटुंब मानलं आहे.* *आज धकाधकीच्या जीवनात, मोबाईल-टीव्हीच्या जाळ्यात अडकलेल्या माणसाला आरोग्याची किंमत उशिरा कळते. अशा वेळी श्री. जितेंद्र महामुनी लोकांना योगासन, प्राणायाम आणि ध्यानाच्या माध्यमातून निरोगी, शिस्तबद्ध जीवन जगण्याचा राजमार्ग दाखवत आहेत. त्यांचे वर्ग म्हणजे व्यायामशाळा नाही, तर ताणमुक्तीची, आत्मशोधाची शाळा आहे.* *त्यांचं कार्य फक्त "आसन शिकवणे" एवढ्यापुरतं मर्यादित नाही. ते लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करत आहेत, व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत आणि निरोगी, संस्कारक्षम समाज घडवण्याचा पाया रचत आहेत. खरी सेवा म्हणजे काय, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे.* *याच सेवाभावाची पोचपावती म्हणून सोनार समाज संस्थेने त्यांना 'समाज गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे जितेंद्र सर हे उत्कृष्ट शंखध्वनीकारही आहेत. त्यांचा शंखनाद केवळ मंदिरातच नाही, तर समाजकार्याच्या प्रत्येक मंगल प्रसंगी घुमतो. सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत ते दरवर्षी शंख वादन सेवा देतात - हीच त्यांच्या भक्तीची आणि सेवेची खरी ओळख!* *आजच्या स्वार्थी युगात असे निःस्वार्थ सेवेकरी दुर्मिळ झाले आहेत. जितेंद्र महामुनी यांनी सिद्ध केले की, शिक्षणाची खरी किंमत तेव्हाच होते जेव्हा ते समाजहितासाठी वापरले जाते.* *अशा सेवाभावी व्रतस्थाला, त्यांच्या पत्नी सौ. मीरा ताईंना, आणि या कार्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक सलाम! श्री गुरु नरहरी महाराज त्यांच्या सेवेला अखंड ऊर्जा देवो, हीच सदिच्छा.* *शब्दांकन: वसंत पोतदार, सोलापूर* *मोबाईल.-942306595 .*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form