शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा व्यक्ती नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ असतो. अशाच एका कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू, संयमी आणि मूल्यनिष्ठ शिक्षकाचा प्रदीर्घ शैक्षणिक प्रवास दिनांक ३१ मे २०२६ रोजी पूर्णत्वास आला. रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. महादेव सुखदेव जेधे यांनी जवळपास तीस वर्षे शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान हे केवळ एका शिक्षकाचे कार्य नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला घडविण्याचा एक प्रेरणादायी इतिहास आहे.
प्रा. महादेव जेधे यांचा जन्म १ जून १९६८ रोजी पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील एका कष्टकरी, सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड, परिश्रमाची तयारी आणि समाजाबद्दलची जाणीव यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिलाईवाडी येथे, तर माध्यमिक शिक्षण यशवंत विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, भोसे येथे झाले. पुढे त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय, शिरूर ताजबंद (जि. लातूर) येथून बी.एड. पदवी संपादन करून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा संकल्प केला.
विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनेक नामांकित संस्थांमधून त्यांना शिक्षक म्हणून कार्य करण्याच्या संधी प्राप्त झाल्या होत्या. मात्र केवळ नोकरी हा उद्देश न ठेवता, शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम मानणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी त्या सर्व संधी नम्रपणे नाकारल्या आणि रयत शिक्षण संस्थेची सेवा स्वीकारली. त्यांच्या जीवनातील हा निर्णय त्यांच्या तत्त्वनिष्ठ स्वभावाचा आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचा उत्कृष्ट नमुना मानावा लागेल.
दिनांक २० नोव्हेंबर १९९७ रोजी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सेवेत प्रवेश केला. शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील संस्थेच्या विविध शाखांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. सुमारे चौदा शाखांमध्ये सेवा बजावताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ विषयज्ञानच दिले नाही, तर संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि जीवनमूल्यांची शिकवण दिली.
अध्यापनासोबतच त्यांनी विविध प्रशासकीय जबाबदाऱ्याही अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. महाविद्यालयातील अनेक समित्यांचे अध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांनी संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान दिले. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात इंग्रजी विषयाचे परीक्षक व नियामक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य बजावले.
त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये रयत सेवक संघाचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” (२००४), महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा “कृतिशील प्राध्यापक पुरस्कार” (२०१८), महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा “आदर्श प्राध्यापक पुरस्कार” (२०२३) तसेच “राजमाता जिजाऊ माँसाहेब राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार” (२०२६) या प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.
प्रा. जेधे सरांबद्दल लिहिताना मला सर्वाधिक भावणारी गोष्ट म्हणजे त्यांचा साधेपणा, नम्रता आणि माणुसकी. पद, प्रतिष्ठा आणि सन्मान मिळूनही त्यांनी कधीही अहंकाराला जवळ केले नाही. विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि समाजाबद्दलची संवेदनशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
आज सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असताना ते आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि समाजातील विविध घटकांना देतात. हीच त्यांची नम्रता आणि महानता आहे.माझ्या दृष्टीने प्रा. महादेव सुखदेव जेधे हे केवळ एक यशस्वी शिक्षक नाहीत, तर शिक्षण क्षेत्रातील निष्ठा, समर्पण आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांचा प्रवास भावी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे कार्य थांबणार नाही. उलट समाजप्रबोधन, युवकांना मार्गदर्शन, शैक्षणिक सल्लामसलत आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे ते समाजकारणात अधिक सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि विचारसंपदेचा लाभ समाजाला पुढील काळात निश्चितपणे मिळत राहील.प्रा. महादेव सुखदेव जेधे सरांना निरोगी, आनंदी, यशस्वी आणि समाजसेवेने परिपूर्ण दीर्घ आयुष्य लाभो, हीच श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना.
शब्दांकन :प्रा. विजयकुमार सुदामराव गायकवाड
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
