सोनार दाम्पत्यांकडून अधिक वाण म्हणून अध्यात्मिक ग्रंथ भेट...!”

“अध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाने आत्मिक समाधान मिळते..!” - कवी रवि वसंत सोनार
पंढरपूर (प्रतिनिधी) : “अध्यात्मिक ग्रंथ व संत साहित्य वाचनाने वाचकांना मानसिक व आत्मिक समाधान मिळते..!” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर (गोपाळपूर) येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या आवडीनुसार त्यांना अधिक महिन्याच्या निमित्ताने अधिक वाण म्हणून श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या वतीने तेहतीस अध्यात्मिक ग्रंथ भेट व त्याचबरोबर खाऊ वाटप प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले - “वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या आवडीनुसार तेहतीस अध्यात्मिक ग्रंथ अधिक महिन्याच्या औचित्याने भेट स्वरूप देताना आम्हा सखा-सखीला खूपच आनंद होत आहे. येथून पुढेही ज्येष्ठांच्या आवडीनुसार ग्रंथ व पुस्तके देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” अधिक महिन्याच्या औचित्याने संपन्न या पुस्तक भेट कार्यक्रमावेळी व्यासपीठावर कवी सोनार यांच्याबरोबर सौ. सविता रवि सोनार, सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष शिरगिरे आणि व्यवस्थापक श्री. राक्षे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. संतोष शिरगिरे म्हणाले की - ” वाचाल तर वाचाल. म्हणून वृद्धाश्रमातील सर्वच ज्येष्ठांनी जास्तीत जास्त अध्यात्मिक पुस्तके वाचण्याचा आनंद घ्यावा.” तर व्यवस्थापक श्री राक्षे म्हणाले की - “श्री. रवि सोनार आणि परिवाराचे मातोश्री वृद्धाश्रमासाठी नेहमीच सहकार्य असते. आज तेहतीस पुस्तक रूपात त्यांनी दिलेली भेट खूपच मोलाची आहे.” कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कवी रवि सोनार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी कवी रवि सोनार यांच्याकडे आणखीन काही पुस्तकांची मागणी केली. रवि सोनार यांनी लवकरच ती पुस्तके पोहोच करण्याचे आश्वासन दिले. यानंतर कवी रवि सोनार, सौ. सविता सोनार आणि संतोष शिरगिरे यांनी सर्व ज्येष्ठांना खाऊ वाटप केले. आपले सण व उत्सव साजरे करताना इतरांनाही आनंद देणारे पंढरपूर येथील आदर्श सखा-सखी सौ. सविता रवि सोनार आणि कवी रवि सोनार यांनी अधिक महिन्याच्या औचित्याने आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल पंढरपूर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले व इतरही सहृदयी व्यक्तींनी अशा प्रकारे सण उत्सव साजरे करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form