वाढते अतिक्रमण आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांना वाहनतळ उपलब्ध करून द्यावे

अस्वस्थ करणारे अतिक्रमण, पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष यामुळे च काॅरिडाॅरचा घाट...
पंढरपूर प्रतिनिधी -- शासनाने कॉरिडॉर उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे खरे. पण स्थानिक, परप्रांतीय, रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांना पुरेसे वाहनतळ उपलब्ध नसल्याने शहराची अवस्था बकाल झाली आहे. स्थानिक नगरपालिका, पोलीस प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षतेमुळे शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच पूर्वीच्या विस्थापितांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याने कॉरिडॉर प्रकल्पाला पंढरपुरातून मोठा विरोध होत आहे. पंढरपूर हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे आणि प्राचीन तिर्थक्षेत्र आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लक्षावधी भाविक वर्षभर ये-जा करतात. त्यामुळे प्रासादिक वस्तू, धातूचे कळस तसेच मुर्त्या, वीणा आणि पखवाज, तुळशी माळा, प्रसाद याच्या व्यापारातून अब्जावधी रुपयांचा ची उलाढाल दरवर्षी होत असते. येणाऱ्या भाविकांना मिळणारे जेवण आणि चहा पाणी यासाठी वर्षाला तीन ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. एकूण पंढरपूरचे अर्थ चक्र पंढरपूरला येणाऱ्या या भाविकांवर अवलंबून आहे. स्थानिक राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या पाठिंब्यावर पंढरपूर मध्ये अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. फळ विक्रेते, मुर्त्या तयार करणारे, कपडे विक्रेते, प्रासादिक वस्तू विकणारे अशा व्यापाऱ्यांनी मंदिर परिसर जणू घेरून टाकला आहे. आषाढी एकादशी यात्रेच्या सोहळ्यापुर्वी आठ दिवस आधी पूर्वतयारी म्हणून मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरचे अतिक्रमण हटविले जाते. यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना केली जात नाही. शहरातील प्रमुख रस्त्यावर बांधण्यात आलेल्या नवीन इमारतींना परवानगी देताना नवीन बांधकामामध्ये पार्किंगची सोय केली आहे की नाही, याची खात्री न करता नगरपालिका प्रशासनाने वापर परवाना दिल्याने स्थानिक वाहन चालक आपली वाहने रस्त्यावरच लावत आहेत. तर बाहेरून येणाऱ्या वाहनांना पुरेसे वाहनतळ उपलब्ध न करून दिल्यामुळे वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. सुट्टीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे अभ्यासून पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था किंवा एकेरी वाहतूक सुरू करणे अपेक्षित आहे. शहरांमध्ये नो पार्किंग झोन निर्माण करून या ठिकाणी पार्किंग साठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. शहरात ठिकठिकाणी असणारे अतिक्रमण कायमस्वरूपी काढून टाकून मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त केले पाहिजेत. यासाठी प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना जाग यायला हवी. तरच हे पंढरपूर शहर वाहतुकीच्या कोंडी पासून आणि धुळी पासून मुक्त होऊन मोकळा श्वास घेईल. केवळ कॉरिडॉरला विरोध करण्याऐवजी पंढरपूर शहर बकाल होण्यापासून वाचवण्यासाठी स्थानिक जनतेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form