मंगळवारपासून स्वा. सावरकर जयंती व्याख्यानमालेचे आयोजन

पंढरपूर प्रतिनिधी -- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ, पंढरपूर संचलित सावरकर मुक्तद्वार वाचनालयाच्या वतीने स्वा. सावरकर जयंती व्याख्यानमाला २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सावरकर पथ येथील 'स्वा. सावरकर क्रांतिमंदिर' मध्ये मंगळवार, दिनांक २६ ते २८ मे या कालावधीत दररोज सायंकाळी ठीक ६ वाजता व्याख्यान सुरू होईल. ३ दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे प्रबोधन पंढरपूरकरांना ऐकायला मिळणार आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (२६ मे) प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सुनील उंबरे हे 'माझी फोटोग्राफी' या विषयावर आपले अनुभव मांडतील. दुसऱ्या दिवशी, बुधवारी (२७मे) अभय उत्पात यांचे 'संघ शताब्दी आणि पंचपरिवर्तन' या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान होईल. अंतिम दिवशी गुरुवारी (२८ मे) सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्वप्नील वाडदेकर हे 'नेटच्या युगात स्वसंरक्षण' या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमाले व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक २८ मे रोजी सकाळी ८:३० वाजता स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन अत्यंत उत्साहात करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर, स्वा. सावरकर प्रेमी मंडळ व स्वा. सावरकर वाचनालय मुक्तद्वार कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. पंढरपूर आणि परिसरातील सर्व राष्ट्रप्रेमी व सुजाण नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form