पंढरपूर/प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात दिलीप धोत्रे गंभीर जखमी
झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर
ते पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. शनिवारी सोलापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथे जाऊन मनसे नेते
दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस
केली. यावेळी त्यांनी धोत्रे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेत लवकर बरे होण्यासाठी
शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील अनेक नेतेमंडळींनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष
भेट देत दिलीप धोत्रे यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. पुण्यातील उपचारानंतर
धोत्रे पंढरपूर येथे आल्यानंतर शनिवारी झालेल्या या भेटीमुळे राजकीय व सामाजिक
क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना धीर दिला. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे
साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय
बंदपट्टे, नगरसेवक प्रसाद कळसे, समाजसेवक बाबा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
