लातूर : समाजातील महिलांवर होणाऱ्या लैंगिक शोषण, अंधश्रद्धा व भोंदूगिरीच्या
वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘एकल महिला संघटना’च्या वतीने जिल्हाधिकारी यांना
निवेदन सादर करण्यात आले. संघटनेने दिलेल्या निवेदनात महिलांवर होणारे अन्याय,
अत्याचार व शोषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः अंधश्रद्धा, जादूटोणा व भोंदूबाबांच्या नावाखाली महिलांचे मानसिक, आर्थिक व
लैंगिक शोषण होत असल्याचे संघटनेने नमूद केले. या निवेदनावर हजरतबी शेख, भाग्यश्री
रणदिवे, आम्रपाली तिगोटे, सुरेखा गोटमुखले, द्रोपदा गवळे, वसुंधरा चिकटे, आयशा
मुजावर, रेशमा तांदळे, ज्योती तांदळे व कविता भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संघटनेने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: अंधश्रद्धा व
भोंदूगिरीच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरोधात कठोर कारवाई करावी अशा घटना
टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात महिलांसाठी कायदेशीर
साक्षरता व जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची
प्रभावी अंमलबजावणी करावी पीडित महिलांना तात्काळ मानसिक व कायदेशीर मदत उपलब्ध
करून द्यावी महिलांची सुरक्षा व सन्मान अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस
पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
