*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न*

पंढरपूर प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत पालक मेळावा दिनांक ७ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना माहिती देणे, पालक व शिक्षक यांच्यात संवाद वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी पालकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून श्री. महादेव जेधे यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. पालक प्रतिनिधी श्री. महादेव जेधे यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन उपस्थित उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केला. यानंतर उपप्राचार्यांनी पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी महाविद्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवावा, विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे आणि त्यांच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. कोंडुरू शिवशंकर यांनी विभागाचा सविस्तर आढावा सादर केला. यामध्ये विभागातील शैक्षणिक उपक्रम, प्रयोगशाळांची सुविधा, विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प, विविध तांत्रिक स्पर्धांमधील यश, तसेच प्लेसमेंट व करिअर मार्गदर्शन उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीचे महत्त्व, अंतर्गत परीक्षांचे मूल्यमापन, अभ्यासातील सातत्य आणि शिस्त याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विभागातील विद्यापीठातील गुणवंत व कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी हा या सत्कारामागील उद्देश होता. त्यानंतर पालकांना आपली मते, सूचना व अभिप्राय मांडण्याची संधी देण्यात आली. पालकांनी विभागाने घेतलेल्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काही विधायक सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीविषयी माहिती मिळवण्यासाठी संबंधित टीचर गार्डियन यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या अभ्यास, उपस्थिती आणि वर्तनाविषयी सविस्तर चर्चा केली. या पालक मेळाव्यामुळे पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे समन्वयक सौ. अंजली चांदणे यांनी सुयोग्य नियोजन करून यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form