* उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात * खाद्यपदार्थ तपासणी
मोहीम राबवावी पंढरपूर दि(13)- चैत्री शुध्द एकादशी 29 मार्च रोजी असून, या यात्रा
कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
यात्रेत शहरात व परिसरात विविध ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात
खाद्यपदार्थाची दुकाने उभारण्यात येतात. या कालावधीत गॅसचा काळाबाजार, साठेबाजी
रोखण्यासाठी विशेष पथकामार्फत तपासणी करून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहील
याबाबतची प्राधान्याने दक्षता घ्यावी ,अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी
दिल्या. चैत्री यात्रा नियोजनाबाबत प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली
यावेळी तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
एकनाथ बोधले, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, मंदीर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले,
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोसले, राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरणाचे श्री. घोडके तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी
प्रांताधिकारी इथापे म्हणाले, सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ
होत आहे. यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक
उपाययोजना कराव्यात तसेच औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध ठेवावी.
मंदिर समितीने दर्शन रांग व पत्रा शेडमध्ये पंखे, कुलर्स मॅट, स्वच्छ व मुबलक
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत
नियोजन करावे. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी मुबलक
व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेने नियोजन करावे. आवश्यकतेनुसार
पिण्याच्या पाण्याची टँकरची संख्या वाढवावी. शहरातीलिअतिक्रमणे व बेकायदेशीर
होर्डींग तात्काळ काढावेत. चैत्री यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात असल्याने अन्न
पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व
औषध प्रशासनाने हॉटेल, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी
करण्यासाठी पथके नेमून मोहीम राबवावी. आरोग्य विभागाने वारी कालावधीत वैद्यकीय पथके
कार्यरत ठेवावी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन
ठेवावा. वीज वितरण कंपनीने सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवावा. एस.टी.
महामंडळाने प्रवाश्यांसाठी बस स्थानकात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध राहिल याची
व्यवस्था करावी. अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री.इथापे यांनी दिल्या. यात्रा
कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल,
हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक
करण्यात येणार आहे. 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पाणी, वीज, स्वच्छता आदी
सुविधा उपलब्ध येणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. चैत्री
यात्रा कालावधीत पत्राशेड, दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदीर मंदीर परिसर येथील
स्वचछता मंदीर समितीच्या वतीने करण्यात आहे. यासाठी स्वयंसेवक व मंदीर समितीच्या
स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध
करण्यात येत असल्याचे मंदीर समितीचे व्यवस्थापक श्री भोसले यांनी सांगितले. यावेळी
प्रांतधिकारी इथापे यांनी सार्वजनिक बांधकाम, तहसिल, पोलीस प्रशासन, पाटबंधारे,
एस.टी, पुरवठा विभाग आदी विभागांचा आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
000000000
