पंढरपूर(प्रतिनिधी) :- मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ व अखंड मराठी न्यूज यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पंढरपूर येथील आदर्श
सखा-सखी श्री व सौ. सविता रवि सोनार यांना - २०२६ सालचा अत्यंत मानाचा व
प्रतिष्ठेचा 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार' देऊन
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबणीस, समाजसेविका सुरेखा भालेराव लेखिका ललिता सबणीस,
समाजसेवक राजेंद्र नागटिळक व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,
पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. आदर्श सखा-सखी असणाऱ्या श्री व सौ.
सविता रवि सोनार यांनी आजवर ओसाड डोंगराळ भागात बीजगोळे टाकणे, वृक्षारोपण करणे,
गरजुंना कपडे; स्वेटर; अन्नधान्य; फळे; पुस्तके; भांडी; रेडिओ; संसारोपयोगी वस्तू
वाटप करणे, साहित्यिक उपक्रम आणि सांस्कृतिक उपक्रम या व इतर बहुविध सामाजिक उपक्रम
कार्याबद्दल मानवतावादी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने त्यांच्या बहुविध, गौरवपूर्ण व
उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान येथील दिमाखदार सोहळ्यात प्रदान
करण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत,
साहित्यिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श सखा-सखी असणाऱ्या
श्री व सौ. सविता रवि सोनार यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे पंढरपूर आणि
परिसरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, अध्यात्मिक, आरोग्य, कला, क्रीडा अशा सर्वच
स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
