पंढरपूर (दि. 11 मे 2025):
मातृदिनाचे औचित्य साधून IIT कॉम्प्युटर्स, पंढरपूर येथे एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांच्या आईंसाठी खास संगणक शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या आईला स्वतः शिकवण्याचा अभिमान आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
या उपक्रमात IIT कॉम्प्युटर्सचे संचालक नितीन आसबे सर, दत्ता कळकुंबे सर, रोहिणी मांजरे मॅडम, वैष्णवी पाटील मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात गुलाब पुष्प देऊन मातांचे स्वागत करून झाली.
विद्यार्थ्यांनी आपल्या आईला संगणक सुरू करणे, बंद करणे, टायपिंग करणे, ग्रेटिंग कार्ड तयार करणे, एक्सेलमध्ये निकाल बनवणे, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे, आर्टिफिशियल इंटेलीजेन्सी मध्ये वर्डआर्ट एआय चा वापर करणे, तसेच ‘ईरा’ प्रणालीविषयी माहिती देणे आणि ती वापरण्याचे प्रशिक्षण दिले. मातांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची उत्सुकता दिसून आली. पहिल्यांदाच संगणकासमोर बसलेल्या अनेक माता या अनुभवाने भारावून गेल्या.
कार्यक्रमानंतर सर्वांना थंड पेय देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना बोलून दाखवत आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रोहिणी मांजरे मॅडम व नितीन आसबे सर यांनी आईचे महत्व अधोरेखित केले. उपस्थित मातांनी अशा उपक्रमांचे कौतुक केले.
मातांनी आपल्या प्रतिक्रिया देताना IIT कॉम्प्युटर्सचे मन:पूर्वक आभार मानले. “आमच्याच लेकरांनी संगणक शिकवला, ही भावना शब्दांत सांगता येणार नाही,” असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
कम्प्युटर शिकल्या त्या मातांनी .. आणि शिकवलं त्यांच्या लेकरांनी! हा अनोखा उपक्रम सर्व उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
Tags
सामाजिक वार्ता