पंढरपूर (प्रतिनिधी):
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण चुकीचे असून, या समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पंढरीत ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अध्यादेश काढला आहे. कुणबी प्रमाणपत्र असलेल्या नागरिकाच्या सग्यासोयऱ्यांनाही हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या आरक्षणास विरोध करण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. या सूचनेनुसार पंढरीतील ओबीसी समाज बांधवांनी
पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. ओबीसी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा या मोर्चामध्ये देण्यात आल्या. छगन भुजबळ आगे बढो... या घोषणेने तहसील परिसर दणाणून गेला.
या मोर्चामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. यासंदर्भात २७ जानेवारी रोजी अध्यादेश काढण्यात आला आहे. हा अध्यादेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. या मोर्चामध्ये विविध संघटना, विविध राजकीय पक्षांमधील अनेक ओबीसी नागरिक उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता