समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले
यांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार प्रदान
पंढरपूर (विनोद पोतदार)
शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे संघटन असणाऱ्या, मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. या निमित्ताने पंढरीत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना, कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये पंढरीतील युवा समाजसेवक मुजम्मिल खलिल कमलीवाले यांना सन्मानित करण्यात आले.
पंढरीतील श्री विठ्ठल इन हॉटेलमध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासो काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात
कमलीवाले यांना सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा, शाल, श्रीफळ तसेच प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुजम्मिल कमलीवाले हे त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते.
कोरोनासारख्या आपत्ती काळात त्यांनी पंढरपूर शहरात मोठे मदतकार्य उभारले होते. कोरोना रुग्णास बेड मिळवून
देण्यापासून ते गरजवंतास किराणा मालाची मदत त्यांच्याकडून देण्यात आली होती. याचवेळी उपेक्षित समाज बांधवास दोन वेळचे अन्नही देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांच्या या कार्याची दखल मराठा सेवा संघाकडून घेण्यात आली आहे.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासो पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत काळे
तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, सर, तालुका पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त सत्यवान भिंगारे, मराठा सेवा संघाचे तालुका सचिव नितीन आसबे तसेच कार्याध्यक्ष एम. एन. गायकवाड सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
##हा सन्मान माझा नसून पूर्ण समाजाचा आणि समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक जणाचा आहे. पुढील काळात हा सन्मान माझ्यासाठी समाजकार्याची प्रेरणा देणारा ठरेल आणि पाठीवर दिलेली कौतुकाची थाप पुढील काळात काम करायला प्रेरणा देत राहील, असा विश्वास यावेळी कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मुजमिल कमलीवाले यांनी व्यक्त केला.##