पंढरपूर प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील संतराज महाराज मंगल कार्यालयात शिक्षक नेते प्रा. सुभाष माने यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक व पदवीधर मतदारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिक्षकांच्या चर्चेनंतर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे, तर पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती वामन माने, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, बापूसाहेब निळ, विजय वाघमोडे, श्रीशैल पाटील, सिकंदर ढवळे, रेवण आवताडे, पंढरीनाथ माने, अशोक यलमार, उज्वला पाटील, विलास तळेकर यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रा. सुभाष माने म्हणाले, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमकपणे आवाज उठवणारा आमदार आवश्यक आहे. जुनी पेन्शन, टप्पा अनुदान, शिक्षक भरती आणि अशैक्षणिक कामांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाशी प्रभावीपणे संवाद साधणारा प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत माने यांनी पेन्शनच्या प्रश्नावर शासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे सांगितले.
मेळाव्यानंतर भाजपचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी उपस्थितांची भेट घेतली. यावेळी प्रा. सुभाष माने यांनी गावडे यांचा सत्कार करून त्यांना पाठिंबा जाहीर केला. शिक्षकांनी शाळा-शाळा संपर्क साधून गावडे यांना प्रथम पसंतीचे मतदान द्यावे, असे आवाहन माने यांनी केले.


