पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचारार्थ सभा संपन्न
पंढरपूर /प्रतिनिधी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पंढरपुरातील श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी येथे पदवीधर-शिक्षक मेळावा घेण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उजनी धरणातील गाळ, अपूर्ण सिंचन योजना, शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न तसेच शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सरकारला लक्ष्य केले. मोहिते-पाटील म्हणाले, उजनी धरणात तब्बल ६४ टक्के गाळ असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे. या गाळाची सरकारी दराने किंमत काढल्यास ती सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या घरात जाते, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे उजनीतील गाळ शास्त्रीय पद्धतीने काढण्याची आवश्यकता असून, यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने तलाव, बंधारे, नाले व नद्या भरल्या होत्या. उजनीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले; मात्र योग्य नियोजनाअभावी पाण्याचा मोठा अपव्यय झाल्याचा आरोप त्यांनी केला. यंदा पाऊस कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने आधीच सूचित केले होते. त्यामुळे कालवा सल्लागार समितीने पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले. भीमा टप्पा-२, शिरापूर उपसा सिंचन, मोहोळ उपसा सिंचन, एकरूख योजना, सांगोला उपसा सिंचन, लाकडी-निंबोडी व मंगळवेढा उपसा सिंचन यांसह मंजूर असलेल्या अपूर्ण योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा येत्या फेब्रुवारीपर्यंत उजनी धरण रिकामे होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे, शिक्षक भरती, बेरोजगारी आणि पदवीधरांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव व जयंत आसगावकर यांना बहुमताने विजयी करून सभागृहात प्रश्न मांडणारा सक्षम आवाज पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, महाविकास आघाडीच्या पदवीधर उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव, काँग्रेसचे आदित्य फत्तेपुरकर, संदीप पाटील, राष्ट्रवादीचे नागेश फाटे, विनंती कुलकर्णी, दीपक वाडदेकर, दीपक पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form