एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बेस्टबिझनेस प्लॅन स्पर्धा’ उत्साहात

एक चांगला संशोधक होण्यासाठी सर्वप्रथम चांगला निरीक्षक होणे आवश्यक-प्रा. संजय ठिगळे
पंढरपूर, दि. २६ सप्टेंबर २०२६ : एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथील उद्योजकता विकास कक्ष व संस्थेची नवोपक्रम परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील नवकल्पना, उद्योजकता, सर्जनशीलता व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘उत्कृष्ट व्यवसाय आराखडा स्पर्धा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयातील वातानुकूलित चर्चासत्र सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. संजय ठिगळे यांचा परिचय करून दिला. प्रा. थिगळे हे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात कार्य केले आहे. तसेच भारती विद्यापीठ, सांगली येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्य केले असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. यानंतर अभिसरण केंद्राचे व्यवस्थापक डॉ. अतुल आराध्ये यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व्यवसाय आराखडा स्पर्धा आणि आयडियाथॉन याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यवसाय आराखड्यात रूपांतर करून त्या प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, तसेच समाजातील विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी प्रमुख पाहुणे प्रा. संजय ठिगळे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी केवळ करिअरच्या संधींचा विचार न करता आपल्याला कोणत्या कार्यातून आनंद, समाधान व आत्मिक समाधान मिळते, याचाही विचार करावा, असे आवर्जून सांगितले. प्रमुख पाहुणे प्रा. संजय ठिगळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना संशोधन व नवोपक्रमासाठी आवश्यक असलेल्या विविध गुणांविषयी मार्गदर्शन केले. एक चांगला संशोधक होण्यासाठी सर्वप्रथम चांगला निरीक्षक होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे, समस्या आणि गरजांचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्यातून संशोधनासाठी नवीन कल्पना निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ बौद्धिक क्षमता वाढविण्यावर भर न देता भावनिक बुद्धिमत्तेचाही विकास करणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. बौद्धिक क्षमतेसोबतच भावनिक समज, संवादकौशल्य, सहकार्याची भावना आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान एआयसीटीईच्या आयडिया प्रयोगशाळेत विद्यार्थी दूत म्हणून कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे प्रा. संजय ठिगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उद्योजकता विकास कक्षाचे प्रमुख प्रा. अतुल कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अभिसरण केंद्राचे व्यवस्थापक डॉ. अतुल आराध्ये, संस्थेच्या नवोपक्रम परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डी. एम. कोरके, आयडियाथॉनचे संयोजक प्रा. बालकृष्ण जगदाळे, तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उद्योजकता विकास कक्षाचे प्रमुख प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यामध्ये नवोपक्रम, उद्योजकता, संशोधनवृत्ती आणि सर्जनशील समस्या-निराकरणाची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form