*श्रीकृष्ण जन्माष्टमी*

*सेवेसाठीचा अभंग....* *कंठी धरीला कृष्ण मनी* *अवघा जनी प्रकाश* *काला वाटू एकमेका* *वैष्णवी निका संभ्रम* *वाकुलीया ब्रह्मदिका* *उत्तम लोका दाखवू* *तुका म्हणे भूमंडळी* *आम्ही बळी वीर गाढे* *अभंगाचा भावार्थ.....* *जगद्गुरु तुकाराम महाराज या सुंदरशा अभंगातून गोपाळ काल्याचे वर्णन करतात.....* मुखामध्ये ज्याने भगवंताचे नाम घेतलेले आहे, ज्यांच्या मनाला भगवंताचा छंद लागतो, त्यांच्या मनालाच भगवंताचा वेध लागत असतो, त्याचा संसार सुखाचा होतो, काहीही कमी पडत नाही, त्याचे जीवन प्रकाशमय होते. भगवान श्रीकृष्ण, करूणेचा महासागर आहेत, मनुष्य संसारात अनेक अडचणी आल्या की देवाचा दावा करतो, कारण संकटात टाळायला देवच उपयोगात येतो, त्याची कृपा झाली तर माणूस संकटापासून पार पडतो, म्हणून ज्याने देवाला आपलेसे केलेला आहे, त्याला काही अधिक करावे लागत नाही. गोकुळातले सुख हे संसार सुख नाही कारण, गोकुळातल्या सुखाला अंतपार नाही, ते अविनाशी सुख आहे, ते परमात्मा सुख आहे, *गोकुळात नंदाच्या घरी भगवान श्रीकृष्ण बाल रूपात अवतीर्ण झाले, त्यामुळे गोकुळातल्या लोकांना अत्यानंद झाला, संपूर्ण गोकुळ वाशी नरनारी या सर्व लोकांना जे परमात्मा सुख भोगायला मिळाले, गोकुळात भगवंताचे आगमन होताच सर्वांना आनंद झाला, म्हणून हा आनंद उत्सव साजरा केला, घरोघरी गुढी उभारल्या, स्वतः परमेश्वरच अवताररुपाने गोकुळात प्रगट झाल्याने, गोकुळ वाशीयांना अत्यानंद झाला, नंदराजाच्या घरी आनंदी आनंद झाला, अशा या भगवंताच्या बाललीला अनेक संतांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेल्या आहेत. भगवंत स्वतः गोकुळातील मुलांच्या बरोबर गाईगुरे घेऊन वनात जात, तेथे त्यांच्या बालक्रीडा होत, गाई गुरे घेऊन जाताना प्रत्येकाने आपापली शिदोरी बरोबर घेणं हा नियम होता ,भगवंत आणि भक्त मिळून एकत्र शिदोरी करून भोजन करतात तो म्हणजे काला होय,* यात कसलाही भेदभाव नसतो. काल्याचा प्रसाद न सांडता, एकमेकांना घास भरवुन खायचा असतो आपण पारायण करताना सात दिवस देवाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, ज्या भक्ती भावाने करतो, त्या नामयज्ञाचा शेवट या काल्याच्या प्रसादाने होतो. श्रीमद् भागवतात देवाने एकदाच काला केल्याचे उल्लेख आहे, या काल्याची पूर्वतयारी देवाने कशी केली, देव गोपाळांना सांगतो, भाकरी व भोकराचे लोणचे घ्या, दही भाताची शिदोरी घ्या, असर असे ताक धूर सारा, या ठिकाणी जसे द्यावे, तसे घ्यावे असे असल्याने थोडी असली तरी शिदोरी शुद्ध व पवित्र हवी असे लक्षात असू द्या, माझी शिदोरी जशी शुद्ध व पवित्र आहे तशी तुमची आहे काय ? नाही तर घरून आईला चोरून लोणी आणा, काहीजण आमच्या घरी कोणीही नाही, तेव्हा श्रीकृष्णा मला तुझ्या पायापासून दूर लोटू नकोस, असा भाव आपला देवापाशी पाहिजे. काल्याचा प्रसाद तुम्हाला नाही, असे गोपाळ स्वर्गातील देवांना वाकुल्या दाखवू लागले, काला खाऊन गोपाळ यमुनेच्या पाण्यामध्ये हात धुवायला येतील, या आशेने *इंद्रादिक देव काल्याचे उच्छिष्ट मिळावे, यमुनेच्या पाण्यात मासे झाले, हे भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आले , त्यांनी बालगोपाल यांना सांगितले नदीत हात व्हायला कोणी जायचे नाही,परंतु यमुनेच्या पाण्यात हात धुवायला कोणी गेलेच नाहीत. प्रत्येकाने आपापल्या कपड्याला हात पुसले, म्हणून देवांना काल्याचा प्रसाद मिळाला नाही.* म्हणून तुकाराम महाराज म्हणतात *तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे* आम्ही भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहोत, देवाचा प्रसाद देवाचा भक्त होऊनच गेला पाहिजे, देव जळातील मासोळी झाले, पण गोपाळ झाले नाहीत, अहंकार आडवा आला, गोपाळ निरभिमानी भक्त होते, देव गोपाळ होऊ शकले नाहीत, *काला सेवन करण्याकरता मनुष्य देहच धारण करावा लागतो,* भगवान देखील वैकुंठात काला करीत नाहीत, काला मृत्यूलोकातच केला, मृत्युलोकातही देवाला मथुरेत, द्वारकेत, काला कर्ता आला नाही, यमुनेच्या वाळवंटातच केला. *जय जय राम कृष्ण हरी*🙏🏻 ✒️ *श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form