*स्त्रीशक्तीची गगनभरारी:स्वातंत्र्यापासून स्वनिर्मितीपर्यंतचा प्रवास*

शब्दांकन - *सौ. प्रीति नंदलाल मोरे, धुळे* विशेष लेख - *स्त्री-सक्षमीकरणावर* भारतीय संस्कृतीत स्त्रीला आदिशक्तीचे स्थान दिले गेले आहे. मात्र, इतिहासाच्या प्रदीर्घ वाटचालीत तिच्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैचारिक स्वातंत्र्यावर अनेक बंधने लादली गेली. आज एकविसाव्या शतकात स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्री सक्षमीकरण या केवळ घोषणा राहिलेल्या नाहीत, तर मानवी हक्क, सामाजिक समता आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडलेल्या मूलभूत संकल्पना बनल्या आहेत. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रियांचा समृद्ध वारसा लाभलेल्या भारतीय स्त्रीने आज अनेक पारंपरिक चौकटी ओलांडल्या आहेत. शिक्षण, विज्ञान, प्रशासन, उद्योग, कला, साहित्य, राजकारण, संरक्षण अशा विविध क्षेत्रांत तिने आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तथापि, स्त्रीमुक्तीचा अर्थ पुरुषांशी संघर्ष किंवा स्पर्धा करणे असा नाही. शतकानुशतके लादलेल्या अन्यायकारक रूढी-परंपरा, मानसिक गुलामगिरी, दुय्यमत्व आणि भेदभावातून सन्मानपूर्वक मुक्त होणे म्हणजे स्त्रीमुक्ती. आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार, स्वतःचे मत निर्भयपणे मांडण्याचे स्वातंत्र्य आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी म्हणजे खरे स्त्रीस्वातंत्र्य. *कुटुंब सांभाळताना स्वतःची ओळखही जपूया* कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि स्त्री त्याची महत्त्वाची आधारशिला आहे. असे असले, तरी कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना स्वतःचे आरोग्य, स्वप्ने, क्षमता आणि आत्मसन्मान यांचा बळी देणे हे सक्षमीकरण नव्हे. स्त्रीने कुटुंबाशी असलेली बांधिलकी जपत स्वतःची स्वतंत्र ओळखही टिकवली पाहिजे. परंपरा जपताना विवेकाची साथ असणे आवश्यक आहे. संस्कृतीचे जतन करताना अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष भेदभाव आणि अन्यायकारक प्रथांना नकार देणे, हीच आधुनिक आणि पुरोगामी विचारसरणी आहे. *शिक्षणातून विचारांची आणि व्यक्तिमत्त्वाची ऊंच भरारी* स्त्री सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण. आज केवळ साक्षरता पुरेशी नाही; उच्च शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञान आणि डिजिटल ज्ञान आत्मसात करणेही गरजेचे आहे. वाचन, लेखन, चिंतन आणि सतत ज्ञानार्जनातून स्त्रीची बौद्धिक ताकद वाढते. शिक्षित स्त्री केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही, तर पुढच्या पिढीच्या विचारविश्वालाही आकार देते. म्हणूनच शिक्षण हे तिच्या स्वावलंबनाचे आणि आत्मविश्वासाचे भक्कम पंख आहेत. *आर्थिक स्वावलंबन : आत्मसन्मानाचा मजबूत आधार* स्त्रीच्या सक्षमीकरणात आर्थिक स्वावलंबनाला विशेष महत्त्व आहे. नोकरी, व्यवसाय, उद्योग, कला किंवा स्वतःच्या कौशल्यावर आधारित कोणतेही काम असो, स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःचे बँक खाते, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन यांची माहिती असणे आवश्यक आहे. आर्थिक निर्णयांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. कारण आर्थिक स्वावलंबन स्त्रीला केवळ पैसा देत नाही, तर निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि आत्मसन्मानही देते. *सामाजिक आणि राजकीय सहभागाची गरज* सक्षम स्त्री केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता विचार करत नाही. समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांसाठी आवाज उठविण्याची संवेदनशीलता तिच्यात असते. राजकीय क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. केवळ आरक्षणाचा लाभ घेणे पुरेसे नाही; तर अभ्यासू दृष्टिकोन, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण आणि प्रशासकीय समज यांच्या बळावर स्त्रीने प्रभावी भूमिका बजावली पाहिजे. *राजकारण आणि स्त्री-सक्षमीकरण : सत्तेच्या पटावरची स्त्री* स्त्रीला सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचवण्याच्या घोषणा आपण मोठ्या अभिमानाने करतो; पण प्रत्यक्ष राजकारणाच्या रणांगणात उतरलेल्या स्त्रीला आजही अनेक अदृश्य भिंतींशी झुंजावे लागते. तिची राजकीय गुणवत्ता, तिचे कर्तृत्व आणि तिची विचारशक्ती यांच्यापेक्षा तिच्या स्त्रीत्वाकडे पाहणारी पुरुषसत्ताक नजर अजूनही पूर्णपणे बदललेली नाही. स्त्रीने राजकारणात यावे, पण नेतृत्वाच्या शिखरावर जाऊ नये, अशी मानसिकता अनेक ठिकाणी अजूनही जिवंत आहे. राजकारणात एखादा पुरुष आक्रमकपणे आपली भूमिका मांडतो, तर त्याला ‘धडाडीचा नेता’ म्हटले जाते; पण तीच भूमिका एखादी स्त्री ठामपणे मांडते, तेव्हा तिच्यावर ‘अहंकारी’, ‘हट्टी’ किंवा ‘मर्यादा ओलांडणारी’ अशी लेबले चिकटवली जातात. म्हणजे पुरुषासाठी आक्रमकता हा नेतृत्वगुण आणि स्त्रीसाठी तो दोष—हा दुहेरी न्याय अजून किती काळ? यापेक्षाही घातक प्रवृत्ती म्हणजे राजकीय विरोधकाला उत्तर देण्यासाठी महिलेच्या चारित्र्यावर चिखलफेक करणे. विचारांना विचारांनी उत्तर देता येत नसेल, तर व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणे ही राजकीय संस्कृतीची नव्हे, तर मानसिक दिवाळखोरीची निशाणी आहे. एखाद्या महिलेच्या राजकीय भूमिकेशी असहमती असेल तर तिच्या धोरणांवर टीका करा, तिच्या निर्णयांची चिकित्सा करा; पण तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणे हा केवळ त्या महिलेचा अपमान नसून संपूर्ण स्त्रीजातीचा अवमान आहे. स्त्रीला बदनाम करणे हे अजूनही काहींच्या हातातील राजकीय शस्त्र का ठरते? हा प्रश्न केवळ महिलांनी नव्हे, तर संपूर्ण समाजाने विचारला पाहिजे. पक्षांतर्गत राजकारणातही महिलांसमोर वेगळे आव्हान उभे राहते. गटबाजी, तटबंदी, अंतर्गत समीकरणे, पदासाठीची अहमहमिका आणि ‘आपला माणूस’ पुढे करण्याची प्रवृत्ती यामध्ये गुणवत्तेला अनेकदा दुय्यम स्थान मिळते. एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येऊ लागली की तिच्या पायाखालची जमीन ओढण्याचे राजकारण सुरू होऊ शकते. तिच्या नेतृत्वाला स्वीकारण्याऐवजी तिच्या चुका शोधल्या जातात; तिच्या यशाचे श्रेय कमी केले जाते आणि अपयशाचे ओझे मात्र तिच्यावर अधिक टाकले जाते. महिलेने पद मिळवले तर ‘कुणाच्या कृपेने?’ आणि पुरुषाने पद मिळवले तर ‘त्याच्या कर्तृत्वाने?’ हा प्रश्न आपल्या राजकीय संस्कृतीच्या मानसिकतेवरच बोट ठेवतो. राजकारणातील महिलांना अनेकदा स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी पुरुषांपेक्षा दुप्पट मेहनत घ्यावी लागते. कारण तिच्यासाठी निवडणूक म्हणजे केवळ मतांचा संघर्ष नसतो; तो समाजाच्या मानसिकतेशी, पक्षांतर्गत समीकरणांशी, कौटुंबिक अपेक्षांशी आणि सार्वजनिक जीवनातील असंख्य पूर्वग्रहांशी लढण्याचा संघर्ष असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलेला राजकारणासाठी वेळ दिला तर प्रश्न विचारले जातात; आणि ती घरापेक्षा राजकारणाला प्राधान्य देते असे समजले जाते. परंतु त्याच परिस्थितीत पुरुषाकडे मात्र ‘समाजकार्य करणारा’ म्हणून पाहिले जाते. घराची जबाबदारी ही स्त्रीचीच आणि समाजाची जबाबदारी ही पुरुषाचीच—हा जुनाट समज मोडल्याशिवाय खरे स्त्री-सक्षमीकरण शक्य नाही. आरक्षणामुळे महिलांना राजकीय व्यासपीठ मिळू शकते; परंतु आरक्षणाने खुर्ची मिळते, नेतृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष मात्र स्वतःच करावा लागतो. महिलेला केवळ पदावर बसवून तिच्या नावामागे पुरुषाने निर्णय घेणे म्हणजे स्त्री-सक्षमीकरण नव्हे. तिच्या हातात निर्णयाचा अधिकार, तिच्या विचारांना स्वातंत्र्य आणि तिच्या नेतृत्वाला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. म्हणून आज गरज आहे ती केवळ राजकारणातील महिलांची संख्या वाढवण्याची नाही, तर राजकीय संस्कृती बदलण्याची. महिलांच्या चारित्र्यावर होणारी चिखलफेक थांबली पाहिजे. गटबाजीपेक्षा गुणवत्ता, व्यक्तिनिष्ठ राजकारणापेक्षा विचार आणि लिंगभेदापेक्षा नेतृत्वक्षमता यांना महत्त्व मिळाले पाहिजे. कारण स्त्री जेव्हा राजकारणात प्रवेश करते, तेव्हा ती केवळ एका पदासाठी लढत नसते; ती आपल्या पुढच्या पिढीतील असंख्य मुलींसाठी राजकीय वाट मोकळी करत असते. आणि म्हणूनच— स्त्रीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून तिचे नेतृत्व संपवता येणार नाही. तिच्या वाटेत गटबाजीचे काटे पेरून तिची वाटचाल थांबवता येणार नाही. तिच्या आवाजाला दाबून तिच्या विचारांना संपवता येणार नाही. कारण आजची स्त्री केवळ सत्तेच्या दारात उभी राहणारी नाही; ती दार उघडून सत्तेच्या निर्णयकेंद्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारी आहे. हीच खरी राजकीय स्त्री-सक्षमीकरणाची दिशा आहे. *सक्षमीकरणाची खरी दिशा* : स्त्री सक्षमीकरण म्हणजे केवळ कायदे, योजना, भाषणे किंवा घोषणांपुरते मर्यादित राहता कामा नये. स्त्रीला समान संधी, सुरक्षित वातावरण, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्त्रीनेही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून स्व-विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्त्रीची संवेदनशीलता ही तिची कमजोरी नाही; उलट तीच तिची मोठी शक्ती आहे. माणुसकी, करुणा, जिद्द आणि कर्तृत्व यांचा सुंदर समन्वय साधत ती समाजाला अधिक संवेदनशील आणि समताधिष्ठित बनवू शकते. आजची स्त्री केवळ घराच्या चार भिंती सांभाळणारी नाही, तर घरापासून समाजापर्यंत आणि समाजापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडणारी शक्ती आहे. तिला कुणाच्या सावलीत उभे राहण्याची गरज नाही; तिने स्वतःच्या कर्तृत्वाचा प्रकाश निर्माण केला पाहिजे. कौटुंबिक नाती जपत, स्वतःची स्वप्ने जपत, आत्मसन्मानाने जगत आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची सुयोग्य नाममुद्रा उमटवत पुढे जाणे—हीच आधुनिक स्त्रीच्या गगनभरारीची खरी ओळख आहे. स्त्री ही केवळ कुटुंबाचा दीप नाही; ती संपूर्ण समाजाचा प्रकाश आहे. तिच्या पंखांना आकाश मिळाले, तर तिची भरारी केवळ तिच्या स्वतःच्या आयुष्याला नव्हे, तर संपूर्ण समाजाला नवी दिशा देऊ शकते. - *लेखिका : प्रीती नंदलाल मोरे, धुळे* (सहसंस्थापक, सकल भारतीय सोनार समाज संघटन सदस्य, सकल भारतीय सोनार समुपदेशन समिती)

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form