*मावळातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच*

*पत्रकार विमा शिबिरात ८० हून अधिक पत्रकारांचा सहभाग; वैद्यकीय विमा, उपचार सवलत आणि पत्रकार भवनासाठीही सहकार्याची ग्वाही*
वडगाव मावळ, दि. २० (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम आज राबविण्यात आला. मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका, भारतीय टपाल खाते आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार विमा शिबिरात तालुक्यातील ८० हून अधिक पत्रकारांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या अपघाती विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेतला. शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे झालेल्या या शिबिरास उद्योजक सुधाकर शेळके आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, टपाल विभागाचे पुणे ग्रामीण सहायक अधीक्षक सुखदेव मोरे, वडगाव मावळ टपाल कार्यालयाच्या शाखाधिकारी स्नेहल उमरजकर, मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुदेश गिरमे, तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. मावळच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे आहे. पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत जनहिताचे विषय पुढे आणले आहेत, असे गौरवोद्गार सुधाकर शेळके यांनी काढले. मराठी पत्रकार संघाने हाती घेतलेल्या प्लास्टिकमुक्त मावळ आणि नशामुक्त मावळ या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. पत्रकारांना अपघात विमा योजनेबरोबरच वैद्यकीय विमा संरक्षण मिळावे, तसेच वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांमध्ये भरीव सवलत मिळावी, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सुधाकर शेळके यांनी दिली. तसेच मावळ तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मराठी पत्रकार संघाने तालुक्यातील सर्व पत्रकारांचे हित लक्षात घेऊन काम करावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी केली. संघटनेच्या सभासदांसोबतच इतर पत्रकार संघटनांचे सभासद असलेल्या पत्रकारांनाही विविध चांगल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. टपाल खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विमा आणि बचत योजनांची सविस्तर माहिती पुणे ग्रामीण सहाय्यक अधीक्षक मोरे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी अशा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. विठुरायाच्या पंढरपूरनंतर संत तुकाराम महाराजांच्या मावळ तालुक्यात पत्रकारांसाठी अपघात विमा संरक्षण योजना राबविण्यात येत असल्याचा आवर्जून उल्लेख तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर यांनी केला. प्लास्टिकमुक्त मावळ आणि नशामुक्त मावळ या दोन महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार सुनील शेळके यांचे विशेष आभार मानले. या विमा शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांना दहा लाख रुपयांपर्यंतचे गंभीर अपघाती विमा कवच तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत अपघाती विमा संरक्षण मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबत पोस्ट ऑफिस बचत खाते, डेबिट कार्ड आणि चेकबुक आदी सुविधांचीही माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदेश गिरमे यांनी केले. विवेक इनामदार यांनी आभार मानले, तर विशाल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. अपघात विमा सुरक्षा कवच उपक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघ मावळ तालुकाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरासाठी डाक विभागाचे रोहित कोळी, प्रथमेश आगाव, यशराज जाधव, बालाजी पवळे, हनुमंत जॉर्डन, लक्ष्मण कुटे, अशोक मोरे, शिवानंद इंगोले, वैष्णवी कोपरकर , भूषण लांघी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form