समाजसेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा सन्मान; पालकमंत्री विजय गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पंढरपुर(प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करणारे पंढरपूरचे युवा समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने “जिल्हा युवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री मा.जयकुमार गोरे यांच्या हस्ते कमलीवाले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना १० हजारांचे बक्षीस,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक (SP) यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंढरपूर शहर व तालुक्यातून महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळविणारे मुजम्मील कमलीवाले हे पहिले युवा समाजसेवक ठरले आहेत, अशी माहिती असून त्यांच्या या सन्मानामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुजम्मील कमलीवाले हे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून गरजू व वंचित नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. भुकेल्या व गरजू व्यक्तींना अन्नदान, बेघर व निराधारांना मदत, गरजूंसाठी कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्यविषयक मदत, रक्तदानासाठी जनजागृती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची शासनस्तरावर झालेली दखल असून, या सन्मानामुळे पंढरपूरच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवा पिढीला नवी प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी पुढील सामाजिक कार्याची प्रेरणा आणि जबाबदारी वाढवणारा आहे,” अशी भावना समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी व्यक्त केली. पंढरपूरच्या भूमीतून सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याने समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form