*१५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना*
पंढरपूर प्रतिनिधी --
आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. ‘आरोग्य संपन्न वारी’ व ‘वारी सहाय्य’ या माध्यमातून पालखी मार्गावर वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, यामध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरवताना कोणतीही उणीव राहू नये. वारी कालावधीत आरोग्य सुविधा देण्यासाठी पंढरपूर येथील स्थानिक डॉक्टरांची उपलब्धता राहण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यांना सूचना दिल्या आहेत पालखी मार्गावरील तसेच शहरातील खासगी वैद्यकीय रुग्णालयांतील दहा टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत,
पालखी मार्गावर वारकरी, भाविकांसाठी ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयूची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक उपचारांसाठी १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ वारकरी भक्तांसाठी उभारण्यात येणार आहेत. २१५ फिरते आरोग्य दूत नेमण्यात येणार आहेत. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी सुसज्ज आयसीयू कक्ष व १७ ठिकाणी तात्पुरते ‘आपला दवाखाना’ सुरू राहणार आहे पालखी मार्गावर एकूण ३५३ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिंडी प्रमुखांना प्राथमिक औषधोपचार किटचे वाटप करण्यात येणार आहे. वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३ हजार ८७ वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच फिरते मनुष्यबळ उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबर ३०२ विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.पंढरपूर येथे वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तीन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. “वारीत वारकऱ्यांची सेवा करणे हे भाग्याचे आहे. सर्वांनी पांडुरंगाच्या सेवेचा भाग म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे
--------
“वारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. --
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
--------
*

