संत ते देव / संतांचे अधिकार

महाराष्ट्रात संतांची मोठी परंपरा आहे, अनादी काळापासून संत अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी कार्यरत होते, संत या शब्दाचा अर्थ सतत म्हणजे जे काल होते, आज आहे, आणि उद्या असणार आहे, म्हणजेच जे कधीही बदलत नाहीत,ते संत धर्माच्या नावाखाली ज्यावेळी अन्याय, अत्याचार, अराजकता, माजते, त्यावेळेस भगवंतांना संत रुपाने अवतार घ्यावा लागतो. पांडुरंगाला, ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार का घ्यावा लागला? याचे सुंदर स्पष्टीकरण, नाथांचे गुरुबंधू रामा जनार्दनी यांनी माऊलींच्या आरतीत दिले आहे. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, *अवतार पांडुरंग, नाव ठेवले ज्ञानी.* जगात ज्ञानाचा लोप झाला, आपले हित कशात आहे, कुणाला कळेना अशावेळी पांडुरंगाने अवतार घेतला त्याचे नाव ज्ञानदेव ‌... *जगद्गुरु तुकाराम महाराज.....* आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साचभावे वर्ताया. संतांचा जन्म आणि सामान्यांचा जन्म यात फरक आहे, आम्हाला जन्माला यावे लागते, आणि संत जन्म घेतात. वैष्णव कुळात अनाथांना कोणी त्राता उरला नाही, म्हणून नाथांचा जन्म झाला. एकनाथ महाराज हे संत कवी होते, मराठी भाषेला विद्वानांची मान्यता मिळवून देणारे, समतेचा पुरस्कार करणारे, सोळाव्या शतकातील मुख्य प्रबोधनाचे प्रवर्तक, त्यांनी एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, हे ग्रंथ अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे, रचना, प्रसिद्ध आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी गुरू जनार्दन स्वामी कडून उपदेश घेतला, श्री सद्गुरुला शरण गेल्याशिवाय कोणताही उपाय नाही त्यासाठी त्यांनी.... साचपने देवा शरण जाती, तया वैकुंठपती विसरेना, देव पाहण्यासाठी काय करायला हवे ! आणि एका नात्याने देव कसा पाहिला, हे सांगितले आहे. जे मनापासून सद्गुरूंना शरण जातात, त्यांनाच देव प्राप्त होतो, संत एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरी चे पहिले संपादक होते. पैठणला आल्यानंतर एकनाथ महाराजांचा घसा दुखू लागला, घशाला सूज आली, यावेळी ना त्यांना एक दृष्टांत झाला, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीनंतर दीडशे वर्षांनी स्वप्नात येऊन सांगितले, माझ्या घशाला अजान वृक्षाच्या मुळीचा वेढा पडला आहे, ती मला टोचत आहे, तरी तू ती काढून टाकावी, दृष्टांतानुसार एकनाथ महाराज आपल्या भक्तगणांबरोबर आळंदीला गेले, तेथे जंगल वाढले होते, ज्ञानेश्वरांची समाधी हुडकून काढली, त्यांनी समाधीच्या अंतर्भागात प्रवेश केला, तो खरेच अजान वृक्षाची मुळी ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठापर्यंत वाढलेली त्यांना दिसून आली, नाथांनी ती मुळी काढून टाकली, जणू मराठीचे ज्ञान भंडार खुले केले ..... याचा अर्थ असा माऊलींना ज्ञानेश्वरी मध्ये शुद्धी करून घ्यायची होती, यासाठी त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला त्या दिवशी एकादशी होती, नाथांनी आळंदी मध्ये किर्तन, हरी जागर केला, इतके दिवस बरोबर आलेल्या लोकांची जेवणाची राहण्याची सोय प्रत्यक्ष माऊलींनी वाण्याचे रूप घेऊन दुकान थाटले, लागेल ते सामान पुरवले, आणि पैसे देण्याकरता लोक गेले त्यावेळेस त्यावेळेस, तुम्ही वारकरी लोक कुठेही पळून जाणार नाही याची मला खात्री आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून येथून परत जाताना मला पैसे द्या, तोपर्यंत लागल ते सर्व सामान तुम्ही खुशाल घेऊन जा, अशाप्रकारे द्वादशीपर्यंत जरुरीप्रमाणे लागेल ते सर्व सामान आणले, आणि बिल चुकते करण्यासाठी ज्या वेळेस ही मंडळी गेली तेथे दुकानही नव्हते आणि वाणीही नव्हता. पैठणला येताच नाथांनी ज्ञानेश्वरी चे संशोधन सुरू केले, ज्ञानेश्वरीत बरेच दोष आढळून येत होते, नाथांनी त्यातील शुद्धा शुद्ध शब्द याचा अभ्यास करून संशोधन करून शुद्ध स्वरूपात ज्ञानेश्वरी सिद्ध केली. फाल्गुन कृष्ण षष्ठीस देह त्याग करण्याचे नाथांनी जाहीर केले, शेवटचे काही दिवस लोक नाथांच्या सानिध्यात अधिक काळ घालवू लागले, जो जो षष्ठीचा दिवस जवळ येत होता तो तो लोक बेचैन होत होते, अखेर शके १५२१ फाल्गुन कृष्ण षष्ठी रविवार, नाथांनी आपल्या गुरुच्या पुण्यतिथीचा हा दिवस म्हणून मोठा उत्सव केला, सकाळीच पूजा वगैरे आटपून सर्व मंडळी सहभोजन केले. दुपारी नाथांनी दिंडी सह गोदावरी नदीच्या वाळवंटात प्रयाण केले, तेथे अखेरचे कीर्तन केले, व हरिनामाचा गजर करीत नाथांनी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली.... गळ्यातील पुष्प माळा पाण्यात तरंगू लागले, गोदावरी नदीच्या पात्रातून नाथांचा देह वाळवंटात आणून मंत्रागणी देण्यात आला. त्या ठिकाणी पिंपळाचे रोप उगवुन आले होते, तेथेच नाथांची समाधी बांधण्यात आली. धर्माची वाट मोडे, अधर्माची शिग चढे ते आम्हा येणे घडे संसारस्थिती आम्हा का संसारा येणे, हरी भक्ती नाम स्मरणे फाल्गुन कृष्ण षष्ठीला *पंचपरवा षष्ठी* म्हणतात, कारण याच षष्ठीला श्री जनार्दन स्वामींचा जन्म झाला, आणि याच स्थितीला जनार्दन स्वामींना दत्त दर्शन झाले, नाथांची व जनार्दन स्वामींची भेट याच षष्ठीला झाली, तसेच गुरु श्री जनार्दन स्वामी आणि एकनाथ यांचे निर्वाणही याच षष्ठीला झाले, अनाथांच्या नाथांना वंदन 🙏🏻करून ही लेखन सेवा, सद्गुरु चरणी अर्पण करतो. ✒️ *श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा फो.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form