*कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट*

पंढरपूर प्रतिनिधी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि डॉ. सोमनाथ लंबे यांनी विकसित केलेल्या पोर्टेबल ऊस पाचट (Sugarcane Trash) कंपोस्टर या अभिनव उपकरणाला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. शेतीतील ऊस पाचट, सुकलेली पाने, तण तसेच इतर सेंद्रिय अवशेषांपासून कमी वेळात व कमी खर्चात दर्जेदार सेंद्रिय कंपोस्ट तयार करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. हे पोर्टेबल उपकरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येते. त्यामुळे शेतातच कंपोस्ट निर्मिती करणे अधिक सोपे व किफायतशीर होते. या उपकरणाद्वारे ट्रॅक्टर किंवा मोठ्या यंत्रांची आवश्यकता कमी होते. . या संशोधनामुळे ऊस पाचट जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून मातीची सुपीकता आणि पाणी धारण क्षमता सुधारण्यास हातभार लागणार आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यासही या उपकरणाची मदत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीला चालना देणारे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ विभाग प्रमुख डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक यांनी डॉ. अनिल बाबर आणि डॉ. सोमनाथ लंबे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. हे पेटंट संस्थेच्या संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form