*एआय हे पत्रकारांचे पूरक साधन; मराठी पत्रकारांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची गरज : हारिस शेख*

मुंबई, दि. ९ जून :* मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशनात ज्येष्ठ डिजिटल पत्रकार व तंत्रज्ञान विश्लेषक हारिस शेख यांनी ‘एआय आणि मराठी पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे पत्रकारांचे पर्याय नसून त्यांचे काम अधिक प्रभावी, वेगवान आणि सुलभ करणारे पूरक साधन असल्याचे प्रतिपादन केले. अधिवेशनाच्या उदघाटन सत्रात बोलताना शेख यांनी आजच्या पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि मराठी पत्रकारितेवर एआयच्या वाढत्या प्रभावावर सविस्तर भाष्य केले. एआयमुळे पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात येतील ही भीती निराधार असल्याचे सांगताना त्यांनी पत्रकारांची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती संकलित करण्याची क्षमता, मानवी संवेदनशीलता आणि सामाजिक संदर्भ समजून घेण्याची ताकद कोणतेही तंत्रज्ञान बदलू शकत नसल्याचे स्पष्ट केले. मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल माहितीचे प्रमाण मर्यादित असल्याने एआय साधनांना अनेकदा भाषेचे अचूक आकलन करण्यात अडचणी येतात. मात्र मराठी पत्रकारांनी एआयचा अधिक वापर केल्यास मराठीतील डिजिटल माहिती समृद्ध होईल आणि भविष्यात अधिक सक्षम मराठी एआय टूल्स विकसित होण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाषांतर, बातम्यांचे प्राथमिक मसुदे तयार करणे, मोठ्या अहवालांचा सारांश काढणे, आकर्षक मथळे सुचविणे आणि डिजिटल माध्यमांसाठी एसईओ अनुकूल मजकूर तयार करणे यासाठी एआय अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. यामुळे पत्रकारांना शोध पत्रकारिता, विश्लेषणात्मक लेखन आणि विशेष वृत्तांकनासाठी अधिक वेळ देता येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी डीपफेक व्हिडिओ, बनावट छायाचित्रे आणि फेक न्यूजच्या वाढत्या धोक्याबाबतही इशारा दिला. एआयच्या युगात फॅक्ट-चेकिंग आणि माहितीची पडताळणी ही पत्रकारांची अधिक महत्त्वाची जबाबदारी बनल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गोपनीय माहिती किंवा अप्रमाणित डेटा एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञानातील वेगवान बदल लक्षात घेता पत्रकारांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगून प्रत्येक पत्रकाराने एआय साधनांचा अभ्यास करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी आधुनिक आणि काळाची गरज असलेल्या विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांचे कौतुक केले. प्रादेशिक स्तरावरील पत्रकारांना तंत्रज्ञानाभिमुख बनविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले २०० पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form