पंढरपूर प्रतिनिधी
सुप्रसिद्ध तबलावादक, वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक, कलापिनी संगीत विद्यालयाचे संस्थापक, अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व तसेच खंडाळी गावचे पोलिस पाटील ह.भ.प. पं. दादासाहेब पाटील (वय 77)यांचे सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ६.०० वाजता दुःखद निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
संगीत, अध्यात्म आणि समाजसेवा या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. तबलावादनातील त्यांचे प्रभुत्व, वारकरी संप्रदायावरील अभ्यास आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेले संगीत शिक्षण यामुळे त्यांना सर्वत्र मानाचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले असून त्यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.त्यांच्या निधनामुळे संगीत, वारकरी आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
*त्यांचा तिसरा दिवस (उठावणा) बुधवार, दि. १७ जून रोजी खंडाळी येथे होणार आहे*.
मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावचे माजी पोलीस पाटील, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व, वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत सेवेकरी आणि संगीत विशारद गुरुवर्य दादासाहेब पाटील यांचे आज सकाळी अचानक दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून संपूर्ण समाजाचे मन विषन्न झालं आहे.
दादासाहेबांनी अनेक वर्षे खंडाळी गावचे पोलीस पाटील म्हणून जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडली. त्यांची ओळख कडक शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि गावाच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व अशी होती. गावातील सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.
वारकरी संप्रदायाबद्दल त्यांना विशेष आस्था होती. अनेक वर्षे त्यांनी आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे नियोजन व नेतृत्व केले. विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांनी अनेकांना दिला. तसेच ते संगीत विशारद होते. तबलावादनातील त्यांचे कौशल्य आणि संगीतसेवा अनेकांच्या स्मरणात राहील.
खंडाळी येथील धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. विशेषतः गावातील सप्ताह महोत्सवाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. समाजसेवा, भक्ती, शिस्त आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेले त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
आज खंडाळी गावाने एक कर्तव्यदक्ष पोलीस पाटील, एक आदर्श वारकरी, एक कुशल संगीतकार आणि एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि पाटील कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
