मागण्या पूर्ण करा, अन्यथा जन आंदोलन; विक्रम शिरसट यांचा इशारा..
पंढरपूर : भादुले चौक ते सोमानी पेट्रोल पंप दरम्यानचा बाजारपेठेतील मुख्य रस्ता पावसामुळे चिखलमय होत असल्याने व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिला तसेच भाजी विक्री करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या समस्यांचा उद्रेक आज बाजार परिसरात पाहायला मिळाला. व्यापारी, भाजी विक्रेते आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत नूतन नगरसेविका प्रतीक्षा शिरसट यांचे पती व माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांना घटनास्थळी बोलावून आपल्या अडचणी मांडल्या.
यावेळी बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की, या परिसरातील रस्त्याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. पाऊस पडल्यानंतर संपूर्ण रस्ता चिखलाने भरून जातो आणि नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना ये-जा करणे कठीण होते. नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भादुले चौक ते सोमानी पेट्रोल पंप हा रस्ता पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्त करून तयार करण्यात यावा तसेच बाजार परिसरात महिलांसाठी सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशा मागण्या नगरपालिकेकडे वारंवार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बाजारातील चिखल व कचरा गाडीत भरून आणून टाकण्यात येईल, असा इशाराही विक्रम शिरसट यांनी दिला.
दरम्यान, महिलांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी नूतन नगराध्यक्षांवरही टीका केली. बाजारपेठेतील रस्ते, स्वच्छता आणि महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
