*१६ वर्षांच्या मुलीचा विवाह ऐनवेळी थांबवला : निर्भया पथकाची धडक कारवाई*

अकलूज दि.६ (प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील माळेवाडी-बोरगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह ऐनवेळी रोखण्यात अकलूज पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाला यश आले आहे.मंडप सजून,अक्षदाची वेळ जवळ आली असतानाच पोलिसांनी धडक कारवाई करत हा विवाह थांबवला, त्यामुळे एक मोठी अनिष्ट घटना टळली आहे. अकलूज पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भया पथकाला शनिवार दि.२ मे रोजी प्राप्त झाली होती.या माहितीच्या आधारे रविवारी दि.३ मे रोजी निर्भया पथक प्रमुख करिश्मा वणवे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल विजय गोरवे,विशाल पोरे,राहुल रणनवरे तसेच पोलीस नाईक रविराज नागरगोजे यांनी संबंधित विवाहस्थळी अचानक भेट दिली.या वेळी विवाह सोहळ्यातील नवरी मुलीच्या वयाची चौकशी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.तपासाअंती मुलीचे वय १६ वर्षे ४ महिने १४ दिवस असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे तात्काळ विवाह सोहळा थांबवण्यात आला.संबंधित मुलगी, नवरदेव व त्यांच्या पालकांना पुढील चौकशीसाठी अकलूज पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.यावेळी पोलिसांनी उपस्थितांना बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे समजावून सांगत मुलीच्या शिक्षणावर भर देणे व तिला स्वावलंबी बनविणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच संबंधित अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती सोलापूर यांच्यासमोर हजर करण्यात आले असून त्यांच्या आदेशानुसार मुलीची बालगृहात व्यवस्था करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके तसेच अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या घटनेमुळे अकलूज पोलीसांच्या सतर्कतेचे कौतुक होत असून समाजात बालविवाहाविरोधात जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form