“'टेक-वारी २.०''महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह” आत्मविकासातून डिजिटल युगासाठी सक्षम होण्याची सुवर्णसंधी -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई प्रतिनिधी -- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतत शिकत राहणे आवश्यक आहे. “'टेक-वारी २.०”मधून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे, तर आत्मविकास, कार्यक्षमता आणि आधुनिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.वारकऱ्यांची पंढरपूरकडे जाणारी वारी जशी शिस्त, श्रद्धा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे “टेक वारी” ही प्रशासनाची तंत्रज्ञानाकडे वाटचाल दर्शवणारी चळवळ आहे. भविष्यात नागरिक-केंद्रित आणि सक्षम शासन घडवण्यासाठी ही वारी महत्त्वाची ठरणार आहे. मागील वर्षीच्या “टेक वारी” उपक्रमाने तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेचा भक्कम पाया घातला असून, हा उपक्रम केवळ तंत्रज्ञानाची ओळख नसून, मानव संसाधन विकासाची व्यापक चळवळ आहे.महाराष्ट्राने “साधना सप्ताह” उपक्रमात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, मिशन कर्मयोगी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सोपा झाला असून, एआयमुळे सेवा वितरण आणि तक्रार निवारण प्रक्रियेत मोठे बदल घडत असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले, टेक वारी उपक्रमात ‘लेफ्ट ब्रेन’ आणि ‘राईट ब्रेन’ या दोन्हींच्या विकासावर भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञान, एआय, भाषा आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विषयांद्वारे विश्लेषणात्मक क्षमतेचा विकास केला जात असून, संगीत, योग, नृत्य आणि संस्कृतीसारख्या उपक्रमांमधून सर्जनशीलता आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राचीन काळातील ‘पुष्पक विमान’ ही संकल्पना आजच्या एआय-सक्षम आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचीच उदाहरण आहे. सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टेक वारी टू”च्या माध्यमातून या सर्व विषयांवर सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपर मुख्य सचिव व्ही.राधा प्रास्ताविकात म्हणाल्या की, ‘टेक-वारी २.०’ या प्रशिक्षण उपक्रमात ६ हजार कर्मचारी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. तसेच या कार्यक्रमांचे राज्यभरातील नऊ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सत्राचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयात डिजिटल गव्हर्नन्स, डीपीडीपी कायदा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्वांटम कॉम्प्युटिंग, जनरेटिव्ह एआयचा प्रत्यक्ष अनुभव, सायबर सुरक्षा, प्रशासनातील नीतिमत्ता तसेच केंद्र सरकारच्या प्लॅटफॉर्म्स या विषयांवर तज्ज्ञांची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या पाच दिवसांत ‘तालरंग’, ‘नादरंग’, ‘योगरंग’, ‘कलारंग’ आणि ‘संस्कृतीरंग’ असे पाच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. एआय एंजट वासुदेव हा नाविन्यपूर्ण प्रयोग या कार्यक्रमात वापरण्यात आला.एआय एजंटने प्रेक्षकांशी संवाद साधला व त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती प्रेक्षकांना दिली. टेक वारीच्या स्मरणिकेचे ही स्वरूपात प्रकाशन करण्यात आले. फ्रंट लाईन कर्मचारी यांचा गौरव यावेळी मंत्रालयातील फ्रंट लाईन कर्मचारी पल्लवी सतीश सावंत,नितीन गुरसाळे, मारुती मदने, रेश्मा जाधव, राहुल वाघमारे, अशोक जाधव, प्रतीक गायकरवाड, संजय कळमरकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘तालरंग’च्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form