*निवृत्तीनंतरचे नाते : तक्रारीचे ओझे टाकून आठवणीचे गाठोडे बांधा.*

*वृद्धापकाळात पती पत्नीच खरे सोबती -- जुन्या हिशेबाने संसार मोडू नका.*
रविवारचा दिवस. संध्याकाळचे सात वाजले होते . मी नेहरूनगरच्या शासकीय मैदानावरून घरी येण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने मला थांबवले ते महसूल सारख्या खात्यातून अव्वल कारकून पदावरून निवृत्त झाले होते.त्यांची पत्नीही शासकीय सेवेत होती तीही निवृत्त आहे. त्यांचे स्वतःचे 35 हजार व पत्नीचे 40 हजार असे एकूण 75 हजार दरमहा त्यांना पेन्शन मिळते. त्यांना दोन मुले, उच्च शिक्षित, नोकरीला. घरात एक नातू, दोन नातींचा किलबिलाट. वरून पाहता सुखाचा संसार ! तो सांगू लागला, रावसाहेब ( महसूल खात्यातील आदरार्थी संबोधन ) मी 40 / 42 वर्षांपूर्वी आई वडिलांसाठी, भावासाठी तसेच सासरसाठीही पैसा खर्च केला. म्हणून आज माझी बायको रोज भांडते. मी काय पाप केलं ? आत्महत्या करू का आता? हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी होते. आवाजात कंप होता. 72 व्या वर्षी गुडघेदुखीने त्याला चालता येत नाही आणि घरात पत्नीच्या टोमण्यांनी जगणं नकोसं झालंय. आई वडील 26 वर्षांपूर्वीच जग सोडून गेले. उमेदीत त्यांना दवाखाना, भावाला मदत, आज त्याच गोष्टी काढून पत्नी गेली वर्षंभर भांडते आहे. मरून जा म्हणते मी पण रेल्वे खाली पडू का? एका कर्तृत्वान सुसंस्कृत माणसाच्या तोंडून हे शब्द ऐकून मी सुन्न झालो. हा एकट्याचा प्रश्न नाहीं. आज हजारोंच्या घरात हेच चित्र आहे. निवृत्ती नंतरची पोकळी, एकटेपणा आणि संवादाचा अभाव यामुळे अनेक घरात आज साठी नंतरचे वाद पेटलेले दिसतात. *भूतकाळाचे ओझे वर्तमानाचा आनंद का हिरावतो.?* आपला समाज त्यागाला पूजतो. पण हिशेब मांडायला लागला किंवा, नाती दुभंगतात. त्या मित्राने ऐन उमेदीच्या काळात आई वडिलांसाठी, भावासाठी आणि त्याच्या मुला मुली साठी जे केले ते कर्तव्य होते. रक्ताच्या नात्यासाठी केलेली मदत ही गुंतवणूक नसते की, जिचा परतावा मागायचा. आज आई वडील हयात नाहीत, भावाचे कुटुंब स्थिर आहे. मग 40 / 42 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आजच्या भांडणाचे कारण कशा होऊ शकतात .? याबाबत एका प्राध्यापक मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली. ते म्हणाले होते की, मानस शास्त्र सांगते की, निवृत्ती नंतर माणसाकडे वेळ भरपूर असतो पण व्यस्तता नसते. मग मेंदू जुन्या फायली उघडतो. तेंव्हा असे व्हायला नको होते, मीच का नेहमी झुकतो. हे विचार नेहमी विष पेरणी करतात. विशेषतः स्त्रियांना वाटते की, " नवऱ्याने माहेर पेक्षा सासर ला जास्त दिली. हा तुलनेचा रोग संसार पोखरतो. " *एका शिपायाची गोष्ट -- वेळेत शहाणपण शिकवणारी*. शासकीय सेवेत एक शिपाई होता . सेवेत असताना साहेबांचा लाडका, वेळेत ऑफिस, सर्वांची कामे, घरी यायला वेळच नाही. निवृत्त झाला आणि चित्रच पालटले. दिवसभर घरीच थांबायचा, पत्नीला ते खटकू लागले. तू घरात नको, मरून जा असे रोज टोमणे. तो शांत पणे म्हणाला,' ठीक आहे, मी मरतो. माझे उरलेले आयुष्य तुलाच मिळू देत.' *काळाने सूड घेतले.* कांही दिवसात तो खरचं गेला. आज पत्नी पॅरालिसिस ने अंथरुणावर आहे. हाक मारली तरी मुलं, सुना काम सोडून येत नाहीत. आता तीच मयत नवऱ्याला शिव्या देते, " मला एकटीला टाकून गेलास. " ही गोष्ट काल्पनिक नाही. अशी शेकडो उदाहरणे समाजात आहेत. जोडीदार हाच खरा सोबती असतो. मुले त्यांच्या संसारात गुंततात. नातवंडे मोठी होऊन उडून जातात. नवरा बायकोने एकमेकांना सांभाळले नाही तर वृद्धापकाळ नरक होतो. *पेन्शन म्हणजे निवृत्ती नव्हे, नव्या इनिंग ची सुरुवात.* शासन दोघांनाही पेन्शन देते.सन्मानाने जगण्यासाठी! महिना 75 हजार रुपये येणाऱ्या घरात पैशाचा प्रश्न नाही, प्रश्न आहे मानाचा ! या वयात नातवंडा सोबत वेळ घालवा, समाज कार्य करा, आवडते छंद जोपासा. डॉक्टर सांगतात वयाच्या साठीनंतर राग, तणाव, भांडण यामुळे बी. पी., शुगर, हार्टअटॅक चे प्रमाण वाढते. आनंदी राहणारे जोडपे 10 वर्षें जास्त जगते . मग जुन्या हिशेबासाठी आयुष्य पणाला का लावायचे ? *पुरुषांनी लक्षात ठेवावे - निवृत्ती म्हणजे घरात साहेबगिरी नाही.*: नोकरीत हुकूम सोडायची सवय असतें. निवृत्ती नंतर घर हेच ऑफिस वाटते. हे आण, ते कर सांगणे, टी. व्ही. रिमोट ताब्यात घेणे, स्वयंपाक घरात नाक खूपसणे याने वाद होतात. 40 / 45 वर्षें संसाराचा गाडा बायकोने एकटीने ओढला. आता तिला मदत करा. पण मालक होऊ नका. भाजी निवडणे, नातवंडांना शाळेत सोडणे यात कमीपणा नाही, भांडे रॅक वर लावणे, झाडून काढणे, पाणी भरणे, किचन कट्टा साफ करून देणे, थोडक्यात सांगायचे तर ऑपरेशन पूर्व सर्व तयारी करून देणे, भूक लागल्यावर स्वतःचे हातानी वाढून घेऊन जेवण करणे वगैरे. यात कमी पणा नाही. तो प्रेम आहे. *स्त्रियांनी समजून घ्यावे : तो 'बाहेरचा ' नाही ' घरचा ' आहे.* नवरा दिवसभर घरात असतो म्हणजे स्वातंत्र्य गेले ही भावना अनेक स्त्रियांना छळते. पण 40 वर्षें तोही तुमच्यासाठीच राबला. सकाळी दहा ते सहा ऑफिस, तुमची व मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी! आता त्याला तुमची गरज आहे. त्याने आई वडिलांसाठी, भावासाठी जे केलं तो त्याचा मोठे पणा होता. तुमच्या माहेर साठी पण कांहीतरी केलायचं ना? त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आज त्यांची टोमणे मारून अवहेलना करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे. *उपाय काय ? -- संवाद, सहवास, सहकार्य हा त्रिवेणी संगम.* 1 *जुने हिशेब फाडून टाका* -- घरात एक माफी पेटी ठेवा. राग आला की कागदावर लिहून त्यात टाका. आठवड्याला दोघांनी मिळून पेटीतील तुम्ही टाकलेली कागद जाळून टाका. भूतकाळ राख होईल. 2 *आपली वेळ ठरवा.*-- रोज संध्याकाळी एक तास फक्त दोघांचा. टी. व्ही. बंद, मोबाईल बंद फक्त गप्पा, फक्त जुन्या चांगल्या आठवणी, चहा. 3 *तडजोडीचे नव्हे, समजुतीचे नाते.*-- तू बरोबर, मी चूक हा वाद संपवा. आपण दोघे बरोबर हे सूत्र स्वीकारा. 4 *आर्थिक पारदर्शकता पण स्वातंत्र्य* -- पेन्शन एकत्रित खर्च करा. पण दोघांनाही थोडी पाकीट मनी द्या. त्याने मित्रा सोबत चहा प्यायला, तिने मैत्रिणी सोबत भिशी लावली पाहिजे. 5 *डॉक्टर नव्हे हमसफर बना* -- एकमेकांची औषधे लक्षात ठेवा . डॉक्टर कडे सोबत जा. मी आहे ना? हे औषधा पेक्षा मोठे आहे. *समाजाने काय करावे.* -- जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे यासारखी संस्थानी,' निवृत्ती नंतरचे समुपदेशन ' शिबीरे घ्यावीत. वाद होण्याआधी संवाद शिकवला पाहिजे. लग्नाच्या 25 / 30 वर्षानंतर प्रत्येक जोडप्याने पुनः एकदा सप्तपदी घेतली पाहिजे . यावेळी सात वचने असतील ती संवाद, सहनशीलता, सहकार्य, समजूतदारपणा, समर्पण, हास्य व आरोग्य. ज्या घरात आज आजी आजोबा भांडतात, उद्या त्याच घरात नातंवंडे मोठे होऊन आई वडिलांशी भांडतील. मुले अनुकरण करतात, उपदेश नाही. आठवणी गोड असाव्यात की कडू हे आजच्या वागण्यावर ठरते. पेन्शन बँकेत जमा होते. पण प्रेम हृदयात जमा करावे लागते. वृद्धापकाळ हा शाप नाही तो सुवर्ण संधी आहे. एकमेकांना नव्याने जाणून घेण्याची, अर्धवट राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची. हिशेबाच्या वह्या बंद करा आणि आयुष्याचे नवीन पान सुरु करा. साठी नंतरचे आयुष्य 'उरले ' नसते ते 'उरले - सुरलेले सोनेरी ' असते. अव्वल कारकून सारखी.... हजारो जोडपी आज,'कोण आधी मरेल 'या स्पर्धेत आहेत.*थांबा ! तुम्ही दोघेही जिंका.* कसे ? वसंत पोतदार, सोलापूर से. नि. ना. तहसीलदार. मोबाईल 942306595

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form