जीवन प्रवासाला 74 वर्षें पूर्ण करून 75 वे वर्षाकडे झुकताना माणसाचा अनुभव आणि उत्साह या दोन्ही गोष्टीचा संगम दुर्मिळ असतो. आज बीड चे श्री. शिवाजीराव राघोबा महामुनी साहेब वाघीरकर ( सेवा निवृत्त मंडळाधिकारी ) वयाचे 75 वे वर्षं गाठले आहेत. त्यांच्या या वाटचालीकडे पाहताना एक समर्पित कष्टाळू आणि आनंदी व्यक्तिमत्वाचा प्रवास समोर येतो.
शासकीय सेवा आणि समाजकारण यांचा सुरेख संगम कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. शिवाजीराव महामुनी साहेब! महसूल खात्यात 36 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिवाजीराव महामुनी यांनी ' तलाठी ' ते ' मंडळाधिकारी ' असा प्रवास अत्यंत निष्ठेने पूर्ण केला. आज त्यांच्या आयुष्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण होत असलेला हा अमृत महोत्सवी क्षण खरोखरच कौतुकास्पद आहे.
शिवाजीराव महामुनी यांचा महसूल खात्यातील प्रवास हा केवळ नोकरी नसून तो जनसेवेचा एक यज्ञ होता.
शासकीय सेवेत असताना त्यांनी शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवताना त्यांनी नेहमीच माणूसकी जपली. शासकीय सेवेच्या नियमात राहूनही सामान्यांना दिलासा कसा देता येईल याचा त्यांनी कायम विचार केला. तथापी त्यांचे खरे मोठेपण हे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आणि सेवेत असताना केलेल्या समाज कार्यात दडलेले आहे.मात्र त्यांचे खरे वैशिष्ट्य म्हणजे सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला समाज कार्यात झोकून दिले. समाजातील तरुण पिढीसाठी वधू वर मेळावे आयोजित करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आज फलद्रूप होत असताना दिसत आहेत. विखूरलेल्या समाजाला एकत्र बांधण्याचे महत्वाचे कार्य ते आजही अविरत करत आहेत. त्त्यांच्या याच निःस्वार्थी समाज सेवेची दखल घेऊन 29 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर सोनार समाज संस्थेच्या वतीने त्यांना अत्यंत मानाचा, " समजभूषण " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर सोनार समाज संस्थेने केलेला हा सन्मान, गौरव त्यांच्या कार्याची पोच पावतीच आहे. 36 वर्षाची निष्कलंक शासकीय सेवा आणि त्यानंतर अखंडपणे सुरु असलेली ही समाज सेवा समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या आयुष्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची काम करण्याची वृत्ती ! वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कार्यरत असतात. ते पाहून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्यासाठी कर्म हेच ईश्वर आहे. कामातच ईश्वर, विठ्ठल पहाणे ही मुक्ती त्यांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरविली आहे. कामाप्रति असलेली ही निष्ठा आणि ओढ यामुळेच त्यांचे शरीर आणि मन आजही प्रसन्न आहे.
आयुष्याच्या दीर्घ प्रवासात त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा कुटुंबाच्या आणि मुला मुलींच्या भविष्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी आयुष्यात जे कांही मिळविले आहे ती केवळ संपत्ती नसून पुढच्या पिढीच्या प्रगतीसाठी केलेली एक भक्कम गुंतवणूक आहे. स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी झीजण्यात त्यांना खऱ्या अर्थाने समाधान लाभले.
कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्रीचा वाटा असतो याची प्रचिती महामुनी साहेबांच्या संसाराकडे पाहताना येते. त्यांच्या पत्नी सौ. सुधाताई यांनी दिलेली साथ मोलाची आहे. आयुष्यात अनेक संकटे आली, परिस्थिती बदलली पण जोडीदाराच्या खंबीर आधारामुळे ते कधीही डगमगले नाहीत. हा आदर्श सहजीवनातून आजही ते समाधानाने उभे आहेत.
शिवाजीराव महामुनी साहेबांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबियांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. त्यांचे सुपुत्र श्री. सचिन सर हे वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन ज्ञान दानाचे पवित्र कार्य करत असतानाच आपल्या पालकांची सेवा करण्यातही धन्यता मानतात. केवळ मुलगाच नव्हे तर तर त्यांच्या सुविद्य सूनबाई सौ. सोनाली मॅडम आपल्या सासू सासऱ्यांची एखाद्या लेकी प्रमाणे उत्तम काळजी घेत आहेत. महामुनी साहेबाना दोन कन्यारत्न असून त्या विवाहित आहेत.सासरी दोघेही समाधानी आणि आनंदित आहेत.
आजच्या धावपळीच्या युगात आपल्या आई वडिलांच्या आरोग्याची आणि आनंदाची अहोरात्र जपणूक करणारा हा आदर्श परिवार पाहून समाजालाही नवी दिशा मिळते. वडिलांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांच्या समाज सेवेला बळ देणारे हे कुटुंब शिवाजीराव महामुनी साहेबांच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
75 वर्षाचा हा कालखंड केवळ आकड्याचा प्रवास नाही. तर तो कष्टाचा, प्रामाणिकपणाचा आणि समाधानाचा प्रवास आहे. आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हाश्य हे त्यांच्या निरपेक्ष कृतीचे प्रतीक आहे . अशा या कर्तृत्वान व्यक्तिमत्वास, समाजभूषण व्यक्तिमत्वास अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!. श्री. शिवाजीराव महामुनी साहेब ( वाघीरकर ) यांचा मधुर भाष्य क्रमांक 82752 68524 असा आहे.
वसंत पोतदार, अध्यक्ष
सोनार समाज संस्था, सोलापूर
मोबा. नं -9423065915
