पंढरपूर प्रतिनिधी --
दहावीनंतर पुढे काय? या विषयावर माईर्स एमआयटी पुणे संचालित, एमआयटी विश्वशांती गुरुकुल वाखरी, पंढरपूर येथे एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शनिवार, ११ एप्रिल रोजी विशेष करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच ते सात वेळेत हे शिबिर होत आहे.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालक यांच्यासाठी हे शिबिर मोफत ठेवण्यात आले आहे. या करिअर मार्गदर्शन विशेष चर्चासत्रात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थी व पालकांना दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी आणि विविध क्षेत्रातील संधींविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच एनडीए म्हणजेच संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी कर्नल डी. के. उपाध्याय मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या बदलत्या काळात उपलब्ध असलेले विविध करिअरचे पर्याय, यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा कोणत्या आणि त्यांची तयारी याविषयी मार्गदर्शन यावेळी करण्यात येईल. या कार्यक्रमात एनडीए, जेईई, नीट, नेव्ही यांसारख्या प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी कशी करावी, सायन्स व कॉमर्स शाखांमधील आधुनिक व उच्च संभाव्यतेचे करिअर पर्याय, योग्य कोर्स निवडीसाठी आवश्यक निकष व भविष्यातील आव्हाने, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सर्व शंकांचे थेट निरसन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथील बसस्टँड, अर्बन बँक, शिवाजी महाराज चौक व ठाकरे चौक येथून दुपारी ४:३० वाजता बसची विनामूल्य व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
