*एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न*

 


पंढरपूर (कोर्टी) : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील एसी सेमिनार हॉलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भव्य वातावरणात पार पडला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध सहशैक्षणिक क्षेत्रांत वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान होताच संपूर्ण महाविद्यालयात आनंद, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून के. बी. पी. कॉलेज, पंढरपूर येथील डॉ. सुशील कुमार शिंदे, तर सन्माननीय अतिथी म्हणून प्रेसिडेंट रनर्स असोसिएशन व टॅक्स कन्सल्टंट श्री. विश्वंभर पाटील तसेच सिंहगड कॅम्पसचे इस्टेट मॅनेजर श्री. रोहन संजय नवले यांची उपस्थिती लाभली.

प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि मित्रपरिवार यांनीही समाधान व आनंद व्यक्त केला.

हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून भविष्यात अधिक उंच यश मिळवण्यासाठी त्यांना नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्रा. शिवाजी पवार, प्रा. अनिल जाधव, प्रा. महेश झाडे, प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. सचिन घाडगे, प्रा. बाळकृष्ण जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थी क्रीडा अध्यक्ष गणेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form