चैत्र यात्रा : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न; मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

पंढरपूर, दि. 29 : चैत्र यात्रा कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा आज पहाटे ४.०० वाजता अनुक्रमे मंदिर समिती सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतलाताई नडगिरे, सल्लागार परिषद सदस्य सुनील रुकारी, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकिळ, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच पांडुरंग दशपुत्रे आदी उपस्थित होते. चैत्र यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चारखांबी, सोळखांबी, श्री संत नामदेव पायरी इत्यादी ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी सनफ्लॉवरची ११,००० फुले, कामिनीचे ६०० बंडल, जिपसोचे ३०० बंडल, अँथेरियमच्या २०० काड्या, पिवळा झेंडू १०० किलो, केशरी झेंडू १०० किलो, पांढरी शेवंती १०० किलो तसेच अष्टर ५० किलो अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला. ही सजावट सुमारे २० कारागिरांच्या मदतीने साकारण्यात आली आहे. सदर फुलांची सजावट पुणे येथील शकुंतला फ्लॉवर मर्चंटचे प्रोप्रायटर राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी सेवाभावी भावनेतून विनामूल्य केली असल्याची माहिती प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form