पंढरपूर, दि. १९ : चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आज
(गुरुवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक
सजावट करण्यात आली असून, त्यामुळे श्रींचा गाभारा अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत
आहे. या सजावटीसाठी पिंक डेझी २५० बंडल, व्हाइट शेवंती ८०० काडी, गुलाब ५० बंडल,
कामिनी ३०० बंडल, जिप्सो २० बंडल, जनाडो पत्ता ३० बंडल, आर्किड १० बंडल, झेंडू ७०
किलो, शेवंती २० किलो, अस्टर २० किलो तसेच अशोक पाला २० माळांचा वापर करण्यात
आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली. सदर फुलांची सजावट विठ्ठल
भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील (रा. रांजणगाव महागणपती) यांनी सेवाभावी
तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम डेकोरेटर्स श्री कुमार शिंदे व श्री
फ्लॉवर्स, पुणे यांनी पार पाडले. या कामासाठी सुमारे १२ कामगारांनी परिश्रम घेतले.
दरवर्षी महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात
विशेष फुलांची आरास केली जाते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या मंदिरामुळे
विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत असून, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या
दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल
झाले आहेत. पहाटेपासूनच नामगजराने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला
आहे.
