*पंढरपूर सिंहगड यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न*

पंढरपूर | प्रतिनिधी पंढरपूर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत दि. ७ मार्च २०२६ रोजी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक व महाविद्यालय यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. के. इनामदार यांनी केले तसेच उपस्थित सर्व पालकांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित पालकांमधून श्री. नंदकुमार दुपाडे यांची पालक समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी सादरीकरणाद्वारे यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाची प्रगती, विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थी, विभागातील विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी तसेच विभागात सुरू असलेल्या नव्या उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना दिली. त्यानंतर उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा पालक मेळाव्यांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान विद्यापीठात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यामुळे कार्यक्रमात उपस्थित पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी चहा व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. पालक मेळावा समन्वयक प्रा. ए. ए. भादुले यांनी उपस्थित सर्व पालक, प्राध्यापक व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या पालक मेळाव्यामुळे पालक, विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form