सोलापूर प्रतिनिधी--
कोंढेज ह. मु. जेऊर ता. करमाळा जि. सोलापूर येथील नामवंत माजी शिक्षिका व
मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती विजया अंबादास महामुनी यांना
त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व समाजोपयोगी शैक्षणिक सेवेबद्दल सोनार समाज संघटना,
सोलापूर या संस्थेच्या वतीने ‘समाज भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान
सोहळा हुतात्मा नगरी सोलापूर येथे दि. 28 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या भारदस्त,
उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात अनेक दशके कार्यरत
राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, शैक्षणिक
गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी
राबविलेल्या विविध उपक्रमांचा या वेळी गौरव करण्यात आला. एक आदर्श शिक्षिका व
कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला
आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.
भीमाशंकर बिराजदार सर हे होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीमती विजया अंबादास
महामुनी यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ प्रशस्तिपत्र व ज्ञानेश्वरी ग्रंथ याचे
प्रदान करण्यात आले. आपल्या मनोगतात श्रीमती विजया अंबादास महामुनी यांनी हा सन्मान
सर्व सहकारी, विद्यार्थी व पालकांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे नमूद करून शिक्षण ही
समाज परिवर्तनाची प्रभावी साधना असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास समाज
संस्थांचे पदाधिकारी, समाज बंधू-भगिनी व आप्त-स्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतराव पोतदार यांनी केले.
