सोलापूर प्रतिनिधी --
_पंढरपूर जि. सोलापूर येथील विवेक वर्धिनी या संस्थेमधून शिक्षक पदावरून
सेवानिवृत्त झालेल्या श्री. हेमंत अंबादास महामुनी यांचा त्यांच्या दीर्घकालीन,
निष्ठावान व समाजोपयोगी सेवेसाठी सोनार समाज संघटना, सोलापूर संस्थेच्या वतीने
‘समाज भूषण’ पुरस्काराने भव्य समारंभात सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात अनेक
वर्षे कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व नैतिक जडणघडणीत त्यांनी
दिलेले महत्त्वपूर्ण योगदान, शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच
समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बिराजदार सर होते. यावेळी मान्यवरांच्या
हस्ते श्री.हेमंत अंबादास महामुनी यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ,प्रशस्तिपत्र व
ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी, शिक्षक हा
समाज घडविणारा खरा शिल्पकार असून श्री. _हेमंत अंबादास महामुनी यांनी आपल्या
कार्यातून आदर्श शिक्षकाचा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला, असे गौरवोद्गार काढले. आपल्या
मनोगतात श्री.हेमंत अंबादास महामुनी यांनी हा सन्मान सर्व सहकारी, विद्यार्थी व
पालकांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात काम करताना मिळालेल्या
अनुभवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी, समाज
संस्थांचे पदाधिकारी, समाज बंधू-भगिनी व आप्त-स्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतराव पोतदार यांनी केले.
