एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे वैयक्तिक कौशल्य विकास व
रोजगारक्षमता मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी :
कोर्टी, ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रथम
वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू अॅडिशन प्रोग्रॅम अंतर्गत
वैयक्तिक कौशल्य विकास व रोजगारक्षमता मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे यांनी दिली.
आजच्या तीव्र स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून, त्यासोबत संवाद
कौशल्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे
तितकेच आवश्यक झाले आहे. हेच लक्षात घेऊन अभियांत्रिकी शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच
विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक सॉफ्ट स्किल्स विकसित व्हाव्यात, या उद्देशाने प्रथम
वर्षापासून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या
उद्घाटनप्रसंगी ‘सी यू सक्सीड’, पुणे येथील श्रीकांत सुंदरगिरी व त्यांच्या टीमचे
स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद
कुलकर्णी तसेच प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ
देऊन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान श्रीकांत सुंदरगिरी व त्यांच्या टीमने
विद्यार्थ्यांना सांघिक कार्य, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, भीतीवर मात करणे,
ध्येयनिश्चिती, शब्दसंग्रह वाढविणे, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे तसेच प्रभावी
सादरीकरण कौशल्य या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना
मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयन डॉ. दीपक
गानमोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. बापुसो सवासे यांनी केले.
