रूक्मिणीमातेला पारंपारिक अलंकार
भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध
वाणवसा करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी
पंढरपूर (ता.14)
प्रतिवर्षीप्रमाणे दि 13 ते 15 जानेवारी या कालावधीत भोगी,
मकरसंक्रांत व किंक्रांत संपन्न होत असून, या सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी
मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. येणाऱ्या भाविकांना
सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा
उपलब्ध केल्या आहेत. तसेच सर्व प्रथा व परंपरेचे पालन करून मंदिरात रंगीबेरंगी
फुलांची आरास करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी
दिली. बुधवार दि. 14 जानेवारीला मकरसंक्रांत निमित्त श्री रूक्मिणी मातेला
पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. त्यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड,
तानवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी
पदक, हायकोल, सरी, कंबरकट्टा, लक्ष्मीहार इत्यादी अलंकाराचा समावेश आहे. तसेच
वर्षभरातील विविध सण – उत्सवा दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व मनमोहक
सजावट केली जाते. त्याप्रमाणे मकरसंक्रांती सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी
मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये गाभारा, चारखांबी,
नामदेव पायरी येथील भाग सजावटीने आकर्षक व मनमोहक दिसत आहे. सदरची सजावट अमोल शेरे,
पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे. त्यासाठी 2000 शेवंती, 100 गुलाब
गड्डी, बेंगलोर शेवंती 10, ऑर्किड 10, ग्रीनरी 30, कामिनी 300, भगवा झेंडू 100
किलो, पिवळा झेंडू 100 किलो व पांढरी शेवंती 50 किलो इत्यादीचा वापर केला आहे. या
सजावटीसाठी सुमारे 50 कामगारांनी परिश्रम घेतले. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या
दर्शनासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी
विचारात घेऊन, सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने टोकन दर्शन पास बुकिंग
व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच थेट दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी
करणे, महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. श्री
रुक्मिणी मातेला सुवासिनी महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली
असून, हजारो महिला भाविक पहाटेपासूनच ताटात हळद, कुंकू, तिळगुळ, ऊस, बोर, गाजर,
हुरडा यासह अन्य प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी मंदिरात आल्या आहेत. फुलांची
सजावट, पुरेसा सोई सुविधा, चांगली स्वच्छता, चांगल्या दर्शन व्यवस्थेने भाविक
समाधान व्यक्त करीत असल्याचे यावेळी प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगीतले.


