पंढरपूर प्रतिनिधी-
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे शनिवार, दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी भारतातील स्त्रीशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजसुधारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. संपत देशमुख तसेच महाविद्यालयातील सर्व महिला वर्ग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले, अशी माहिती प्राचार्य डॉ. करांडे यांनी दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. स्त्रीशिक्षण, सामाजिक समानता, विधवांचा सन्मान आणि जातीय विषमता निर्मूलन या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांविरुद्ध त्यांनी ठामपणे लढा दिला. विधवांचे केशवपन बंद करण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणून त्यांनी स्त्रीसन्मानासाठी धाडसी पाऊल उचलले.
सन १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. प्रतिकूल सामाजिक परिस्थिती, अपमान, बहिष्कार आणि विरोध यांचा सामना करूनही त्यांनी शिक्षणाचा वसा अखंडपणे पुढे नेला. स्त्रीशिक्षणाची चळवळ उभी करून त्यांनी हजारो महिलांच्या जीवनाला नवी दिशा दिली.
सावित्रीबाई फुले या केवळ समाजसुधारकच नव्हे, तर एक संवेदनशील लेखिका व कवयित्री देखील होत्या. त्यांच्या ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय व मानवी मूल्यांचा प्रसार केला. ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘बालिका दिन’ म्हणून साजरा केला जातो, जो स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून गौरविण्यात येते.
या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी प्रा. अंजली पिसे, निशा करांडे, संगीता कुलकर्णी, सारीका नवले, रुपाली खंडागळे, तेजस्वी झरकर, वैष्णवी उत्पात, अमृता माळी, सोनाली गोडसे, जयमाला हिप्परकर, धनश्री सुरवसे, पुनम गवळी, वंदना माळी तसेच प्रा. महेश झाडे, प्रा. समाधान माळी, प्रा. अक्षय सावंत, विकास इतापे, पांडुरंग परचंडे, अंकुश अवताडे, गणेश वसेकर, शुभम नवले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.