*डोंगराळे अत्याचार प्रकरणी आक्रोश मोर्चामुळे संभाजीनगर शहर दणाणले*

◼️फास्ट ट्रॅक खटला चालवून आरोपीला त्वरित फाशी देण्याची शासनाकडे आग्रही मागणी◼️
छत्रपती संभाजीनगर (प्रवीण बुरांडे): 
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून निर्घूण हत्या झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात सकल सोनार समाज, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने शुक्रवारी  ५ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास या आक्रोश मोर्चास सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरूवातीसच यज्ञा दुसाने हिस श्रद्धांजली वाहण्यात आली. संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा त्वरित द्यावी आणि यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. शेकडो तरूणी, महिला आणि बालिकांची संख्या सदर मोर्चात अग्रस्थानी होती. या मोर्चात विविध समाजाच्या नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत या मोर्चास आपला पाठिंबा दिला. ठिकठिकाणी विविध नागरिकांतर्फे मोर्चेकर्‍यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. 
या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सराफांनी आपापली दुकाने बंद ठेवलेली होती. या मोर्चास जिल्ह्याबाहेरून नागरिकांची लक्षणीय संख्या होती. मोर्चाचे एक टोक क्रांतीचौकात होते तर दुसरे टोक हे गुलमंडी चौकापर्यंत होते. मोर्चेकर्‍यांच्या हातामध्ये विविध घोषणांचे फलक होते. तसेच सदर घटनेच्या निषधार्थ हजारो मोर्चेकर्‍यांनी आपल्या हाताला काळी पट्टी लावून निषेध नोंदवला.  या मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलीसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
⏩*आरोपीच्या फाशी शिवाय दुसरी शिक्षा नको : लहान मुलींची एकमुखी मागणी*
श्री संत नरहरी महाराजांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. क्रांती चौक, पैठण गेट, सिटी चौक, किलेअर्क मार्गे विभागीय आयुक्तलयासमोर या मोर्चाचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समारोप करण्यात आला. यानंतर वैदेही कुलथे, आदिती डहाळे,आकांक्षा कुलथे,सिद्धी दिवेकर, आरोही काथार अशा ५  मुलींची प्रातिनिधीक स्वरूपात व्यासपीठावरून भाषणे झाली. अतिशय  लहान बालिकांवर आणि स्त्रियवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. परिणामी महिला वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. राज्य शासनाने अशा घटना होऊ नयेत म्हणून कडक कायदे अंमलात आणले पाहिजेत, असे मुद्दे या मुलींनी मांडले.   यानंतर विभागीय आयुक्त प्रशासनाने मोर्चातील महिलांच्या शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. 
यावेळी विभागीय आयुक्तालयासमोर व्यासपीठावर मध्य विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, मा. नगरसेवक सचिन खैरे, किशोर नागरे, आंबेडकरी नेते विजय वाहुळ, ह.भ. प. निवृत्तीनाथ वाडेकर महाराज, साध्वी सु.श्री.धर्मासिंहनी डॉ.गायत्री दिदी, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी परखडपणे विचार मांडले. 
⏩*अधिवेशनात मुद्दा प्रखरपणे मांडणार  : आ. प्रदीप जैस्वाल यांची ग्वाही*
विधीमंडळाच्या येऊ घातलेल्या नागपूरच्या अधिवेशनात राज्य शासनाचे या प्रकरणी लक्ष वेधून संबंधित अत्याचार करणार्‍या नराधमास कठोरात कठोर कार्यवाही करून भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी आपण आग्रही मागणी सरकारपुढे निश्चित करणार असन हा खटला फास्ट ट्रॅक न्यालयात लढवण्यात यावा आणि या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे मी करणार अशी ग्वाही यावेळी आ. प्रदीप जैस्वाल यांनी केली. याप्रसंगी अतिशय परखडपणे बोलताना आ. जैस्वाल म्हणाले की, अशा बलात्कारी प्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे. अशा घटना वारंवार होऊ नयेत यासाठी शासनाने कडक पाऊले उचलली पाहिजे. तसेच संबंधितास शासन त्वरित कठोर कारवाई करणार नसेल तर अशा नीच प्रवृत्तींना पोलीसांकडे सोपवण्याऐवजी आमच्याकडे सोपवावे म्हणजे आम्ही त्यास आमच्या खास शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असा इशारा दिला. 
*⏩अत्याचारी प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढा :  साध्वी सु.श्री.धर्मासिंहनी डॉ.गायत्री दिदी*
अत्याचारी प्रवृत्ती असलेल्या नराधमांची यापुढे हिंमत होऊ नये अशा प्रकारची कठोर कारवाई करावी अशी मागणी धर्मसिंहींनी दीदी यांनी केली. आजच्या स्थितीत स्त्रीवरील अन्यायाच्या विरोधात आणि हक्कांसाठी स्त्रीला रस्त्यावर येऊन लढाई लढावी लागत आहे अशी शोकांतिका आहे. राज्य शासनाने डोळेझाक करू नये आणि अत्याचार मुक्त महाराष्ट्र खर्‍या अर्थाने घडवायचा असेल तर त्वरित कठोर निर्णय घ्यावा लागेल अशी मागणी केली. 
याप्रसंगी आदित्य दहिवाळ, प्रमोद टेहरे, मयर रांजणगांवकर , महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सचिव सुधाकरराव धानोरकर, नरहरी सेनेचे अध्यक्ष भास्करराव टेहरे, प्रमोद टेहरे,गजानन टेहरे, संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे सहसचिव सुहास बार्शीकर, बांधकाम समिती सदस्य विजय देवळालीकर, डॉ. शरदचंद्र वानखेडे, अखिल सुवर्णकार कारागीर संघटनेचे अध्यक्ष कैलास बुटे, सुरेश टाक, सोपानराव मुंडलिक, शशिकांत उदावंत, बंडू टाक, मयुर रांजणगावकर, निखिल कुलथे, किरण बुटे,शशिकांत उदावंत, नितीन सावखेडकर, संजय सावखेडकर, विजय कल्याणकर,  राम उदावंत, दिनेश दहिवाळ, नंदू चिंतामणी, योगेश शहाणे, उमेश क्षीरसागर, सुभाष उदावंत, राजेंद्र उदावंत, भगवानराव शहाणे, बाळासाहेब शहाणे,बंडू अडाणे,अमोल शहाणे, बालाजी टाक, मंगेश जवळगावकर,भारत कल्याणकर, श्रीधर डहाळे, ज्ञानेश्वर शहाणे, अॅड. नवीनकुमार जोजारे, प्रवीण बुरांडे, प्रा. जगदीश वेदपाठक,  अॅड. नवीनकुमार जोजारे,  मच्छिंद्र नागरे, स. सो. खंडाळकर,  विश्वजित कुलथे,  मनोहर विखणकर, अनिल सोनवणे, गणेश दुसाने, किशोर दुसाने,  निखिल कुलथे, शुभम अधिकार, ओंकार शहाणे, शुभम टाक, विराज बागल, सचिन टेहरे, हरी अडाणे, अनिल टाकळीकर, सौरभ उदावंत, संतोष डहाळे, उमेश राजूरकर, सुनील क्षीरसागर, विश्वजित कुलथे,  मनोहर विखणकर, अनिल सोनवणे, गणेश दुसाने, किशोर दुसाने,  निखिल कुलथे, शुभम अधिकार , सौ. अनिताताई दारव्हेकर, सौ. रेखाताई डहाळे, सौ. जयश्री बुटे, सौ. अनिता शहाणे, सौ. अनिता बुटे, सौ. वंदना मांडवे, सौ. संगीता टाक, सौ. सीमा वाघ, सौ. सुनंदा डहाळे, सौ. अरुणा शहाणे, सौ. गीता शहाणे, सौ. अंजली जोजारे आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
*⏩आदित्य दहिवाळ आणि संयोजकांचे अथक परिश्रम*
शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते तथा मोर्चाचे प्रमुख संयोजक आदित्य दहिवाळ आणि त्यांचे सहकारी हे एका जीपमधून मोर्चकर्‍यांना वारंवार सूचना देत मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत होते. अतिशय शिस्तबद्ध रित्या हा मोर्चा पार पडला. या आक्रोश मोर्चाच्या संयोजकांकडून गेल्या १५-२० दिवसांपासून शहरातील आणि जिल्हाभरातील व्यापारी वर्ग, शाळा आणि कॉलेजेस, कोचिंग क्लासेस आदी ठिकाणी भेटी देऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थी, विद्यार्थीनींना केलेले होते. सर्व धर्मातील नागरिक, व्यापारी आणि सर्वसामान्यांनी मोर्चात सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form