पंढरपूर प्रतिनिधी:
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे लिखित "चोखिया – चोखियांचे अवघे कुटुंब संत" या संत चरित्रात्मक ग्रंथाचे प्रकाशन लोकायत प्रकाशन संस्था, सातारा येथे संपन्न झाले. या ग्रंथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते रवी सर्वगोड व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.
या वेळी बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, “चोखियाने आणि त्यांच्या कुटुंबाने कमालीचे हालअपेष्टा सोसल्या. उपासमार, दारिद्र्य, वेठबिगारी, अपमान, विडंबना, मारहाण – हे सर्व सहन करत त्यांनी जीवन जगले. या अन्यायाविरुद्ध त्यांनी विद्रोहाचे उदगारही काढले. मात्र, तरीही काही मूल्ये त्यांनी कायम जपली – कोणावरही द्वेष नाही, मत्सर नाही. ही संतत्वाची खरी ओळख आहे.”
“अशा लोकांविषयी आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. आणि जरी कुणाला ती वाटत नसेल, तरी निदान सहानुभूती तरी असावी,” अशी भावपूर्ण प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमास मा. पार्थ पोळके, अमित मेधावी, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. प्रशांत गायकवाड, लोकायत प्रकाशनचे राकेश साळुंके, जयराज शेंबडे, इंद्रजित घुले, अॅड. विनायक सरवळे, कृष्ण सर्वगोड, सुरज साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता