आई प्रेम आणि त्यागाचे प्रतीक --अखंड सौं. चंद्रभागा पोतदार

आज मातृ दिन. विशेष....्
माझी आई अखंड सौं. चंद्रभागा  रामचंद्र पोतदार हिला अनंतात जाऊन पंचवीस वर्षें होऊन गेली. आज माझी आई माझ्या सोबत  नसली तरी, स्वर्गातील आईला आमच्यावर नेहमीच ती प्रेम केल्यावर तिला धन्यवाद देतो. आज आमची आई आमच्या सोबत नसली तरी तिचे प्रेम नेहमी आमच्या सोबत राहून आम्हास मार्गदर्शन करत असल्याचे जाणंवते. ती आमच्या हृदयात आहे. आम्ही तिच्यावर प्रेम करतो. तिची नेहमी खूप खूप आठवण येते. आम्ही तीन भावंडे आणि एक बहीण. सर्वात मोठी बहीण श्रीमती कृष्णा बाई आज तिचे वय वर्षें 87 असून ती सासरी राहते. मोठा भाऊ श्री काशिनाथ हा जिल्हा परिषदेत शिक्षक होते त्याचे अकाली वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले. तरुण मुलाच्या निधनाने पुत्र वियोग काय असतो ते माझ्या आई वडिलांनी अनुभवले. त्याचे कुटुबिय वळसंग  सोलापूर येथे राहतात.दोन नंबरचा भाऊ मुरलीधर हा पंधरा वर्षें भारतीय सैन्य दलात सेवा करून करून आता सेवानिवृरीचे जीवन आनंदाने जगत आहे. त्याचेही वय आज घडीस 75 वर्षें आहे.मी वसंत सर्वात लहान असून माझेही वय आता 70 वर्षें असून मीही सेवानिवृतीचे जीवन आनंदाने व्यथित करीत आहे. आम्ही दोघेही सोलापुरात वास्तव्यास आहोत. 
माझी आई फार कष्टी होती. तिने शेतीची, शेत मजुराची कामे माझ्या दोन्ही भावांना नोकरी लागेपर्यंत केली. तिने कष्ट केले. मी नोकरीस लागल्यानंतर सोलापूर येथे वास्तव्यास आल्यावर आईचे थोडे कष्ट कमी झाले . माझी आईला स्वच्छतेची आवड होती. तिला घर, अंगण स्वच्छ ठेवण्यास खूप खूप आवडे. आई रोजचे रोज घर नीट आवरत असे. सकाळी उठल्यावर रात्री झोपे पर्यंत ती सतत कांहीना कांही काम करीत असायची. 
मोठा भाऊ काशिनाथ व मधला भाऊ मुरलीधर हायस्कुल ला अक्कलकोट येथे शिकायला होते. अक्कलकोट -- भुरीकवठे एस टी. बस ची त्याकाळी सोय नव्हती. वागदरी गावापर्यंत एस टी येत. आई पहाटे लवकर उठून स्वयंपाक करायची, डबा बांधून द्यायची, वडील डबा घेऊन वागदरीस चालत जाऊन सकाळी 7 च्या एस टी ला डबा नेऊन द्यायचे हे रोजचेच त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत चालू होते. माझ्या वेळेस वागदरी स नव्याने हायस्कुल चालू झाले होते. माझ्या भुरीकवठे गावात सातवी पास झाल्यानंतर मी हायस्कुल ला वागदरीस प्रवेश घेतला.वागदरी -- भुरीकवठे अंतर चार मैलाचे. माझी शाळा सकाळी 11 : 45 ला असायची. जाणेसाठी एस टी सकाळी सात वाजता होती. साडेचार तास आधी जाऊन काय करायचे म्हणून दररोज सकाळी पावणे दहा वाजता इतर मुला सोबत चालत जायचो. एस एस सी ला गेल्यावर मात्र मला सायकल मिळाली. एस एस सी नंतर अक्कलकोट ला कॉलेज ला प्रवेश घेतला. त्यामुळे पुनः आईला पहाटे उठून डबा करावे लागू लागले. वडील सकाळी सात च्या एस टी ने रोज डबा पाठवत आणि मी रिकामा डबा रात्री अक्कलकोट हुन सुटणाऱ्या एस टी ने गावी पाठवायचो. ती एस टी गावी रात्री साडे नऊ दहाला यायची डबा घेण्यासाठी वडील रोज गाडीची वाट पाहत स्टॅन्ड वर बसायचे. आमच्या साठी आई वडील दोघांनीही अपार कष्ट घेतले आहेत. मला आठवते लहानपणी मी टॉयफाईड ने आजारी पडलो. तेंव्हा माझ्या आईची रात्रीची झोप उडाली होती. देवाजवळ माझ्यासाठी प्रार्थना करायची तर कधी मी एकदाचा लवकर बरे होईन म्हणून सतत काळजी करायची आणि तशी आस देवाजवळ धरायची. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर लवकर नोकरी मिळावी म्हणून व्रत वैकल्ये करायची. माझी आई माझी माऊली! तिचे जन्मभराचे ऋण आहेत. त्याशिवाय जीवनात कोणतेच सार नाही. माझ्या आईच्या कौतुकासाठी माझेकडे बोल, नाहीत, शब्द नाहीत. तिच्या यातनाना, हाल अपेष्ठाना, कष्टाला या जगी तोड नाही. या जगात तिच्या शिवाय कशालाच मोल नाही. आईच्या हातांच्या जेवणाचा सुंदर चमचमीत आठवणी आहेत. आईच्या हातच्या जेवणाला सुंदर चव असायची. कधी कधी उरलेल्या भाताला फोडणी देऊन आई वाढायची. फोडणीची पोळी खमंग, कुरकुरीत लागायची. आईच्या हातचे पदार्थ कुठल्याच हॉटेलात मिळणे अवघड आहे. वर्षभर आई सतत कांही ना कांही करून खाऊ घालायची. सणवाराला ती पुरण पोळी, बासुंदी, खवा, शेंगाची पोळी, दिवाळीत सर्व पदार्थ घरीच बनवायची. आई गेली आणि तिच्या हातच्या अमृताला मी गमावून बसलो. पण त्या आठवणी अजूनही गर्भ रेशमी आहेत. म्हणून जपून ठेवल्यात.  तिने आम्हाला सत्याच्या मार्गांवर चालण्यास शिकवले. आई प्रत्येकाच्या आयुष्यात एक वरदान आहे. तिच्या आशिर्वादामुळे आपण घडतो. मी माझ्या आईवर ती हयात नसताना ही खूप खूप प्रेम करतो आणि मला सर्वोत्कृष्ट आई दिली म्हणून देवाचे आभार मानतो. देवाच्या या आई रुपी अविष्कारला माझा मनापासून सलाम !  शेवटी आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील. तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील. आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे. कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली. 
   वसंत पोतदार सोलापूर 
 942365915

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form