पंढरपूर प्रतिनिधी --
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित गौतम विद्यालय, पंढरपूर येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री आठवले यांनी गौतम विद्यालयाची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व आवश्यक सोयी सुविधांची माहिती घेतली. तसेच विद्यालयासाठी प्रस्तावित असणारी १४ कोटीची इमारत लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. गौतम विद्यालयाची पवित्र भूमी संत गाडगे महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीचा विकास करण्याचे ध्येय सर्वच आंबेडकर प्रेमींनी बाळगांव. नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री श्री आठवले यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव, महात्मा फुले विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी गौतम विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री आठवले यांचा सत्कार केला.
Tags
सामाजिक वार्ता